लंडन: मी कोणाचेही पैसे चोरलेले नाहीत. भारतीय बँकांना कर्जफेडीच्या प्रस्तावाबाबत मी कोणत्याही भुलथापा दिल्या नव्हत्या, असा दावा मद्यसम्राट विजय मल्ल्या याने केला. मल्ल्याने सोमवारी लंडनच्या वेस्टमिनिस्टर न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मल्याने म्हटले की, मी कोणाचेही पैसे चोरलेले नाहीत. मी कर्नाटक उच्च न्यायालयात कर्ज परतफेडीसाठीचा सुधारित विनंती अर्ज दाखल केला होता. यावेळी प्रसारमाध्यमांनी कर्ज परतफेडीचा हा प्रस्ताव कितपत खरा होता, असा प्रश्नही मल्ल्याला विचारला. त्यावर मल्ल्याने म्हटले की, खरं किंवा खोटं असं काहीही नसतं. मी न्यायालयात कर्ज परतफेडीचा प्रस्ताव सादर केला होता, हे लक्षात घ्या. कोणीही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करु शकत नाही, असे मल्ल्या याने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित बातमी अखेर मुसक्या आवळल्या!, विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मुंजरी


दरम्यान, लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाने सोमवारी विजय मल्ल्या याला भारताच्या ताब्यात देण्याचे आदेश यंत्रणेला दिले. आता हे प्रकरण लंडनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलेय. केंद्रीय अन्वेषण विभागाने वेस्टमिनिस्टर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.


संबंधित बातमी भारतात आणल्यावर मल्ल्याची रवानगी 'या' कारागृहात


गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक झाली होती. तेव्हापासून तो जामिनावर आहे. आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्याने केला होता. आपली किंगफिशर एअरलाईन्स चालू ठेवण्यासाठी आपण बँकांकडून कर्ज घेतले होते, असा बचाव त्याने केला आहे. मी एका कवडीचेही कर्ज घेतले नाही. ते ‘किंगफिशर’ने घेतले आहे. सचोटीने केलेल्या व्यवसायातील अपयशामुळे हा पैसा बुडाला. त्याला मी जामीन असणे म्हणजे फसवणूक ठरत नाही, असा दावाही मल्ल्याने केला होता.