अहमदाबाद :  गुजरातमध्ये भाजप सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन करतेय. विजय रुपाणींच्या नेतृत्त्वात नव्या सरकारचा शपथविधी आज पार पडणार आहे.  दरम्यान, पाटीदार समाजातील ६ जणांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह उपमुख्यमंत्री नितीन पटेलही शपथ घेणार आहे. तर सहाहून अधिक कॅबिनेट मंत्री तर 12 ते 14 राज्यमंत्री यावेळी शपथ घेण्याची शक्यता आहे. शपथविधी समारोह सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल. 


सचिवालय मैदान इथं होणा-या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 


दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे विजय रुपाणी यांनी गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कथित विजय मुहूर्तावर शपथ घेतली होती. त्यापूर्वी आनंदीबेन पटेल यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी त्याच मुहूर्तावर शपथ घेतली होती. 


गुजरातमध्ये चारवेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विजय मुहूर्तावर अर्थात दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी शपथ घेतली होती. मात्र यावेळी हे मिथक तुटणार आहे.