गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही- मोदींचा इशारा
गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी हे विधान केलं आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मोदींनी दिला आहे. तसंच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचा कुठल्याही प्रकारे बचाव करण्यात येऊ नये असंही मोदींनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : गोरक्षणाच्या नावाखाली गुंडगिरी करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी हे विधान केलं आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मोदींनी दिला आहे. तसंच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचा कुठल्याही प्रकारे बचाव करण्यात येऊ नये असंही मोदींनी म्हटलं आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही बैठक बोलावली होती. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएचे नेते आणि काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते सहभागी झाले होते. जेडीयूचे नेते मात्र या बैठकीत सामील झाले नव्हते.
संसदेचं कामकाज सुरुळीत चालावं आणि सा-यांनी सहकार्य करावं यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत-चीन सीमा वाद, काश्मीर स्थिती, शेतक-यांचा संताप, जीएसटी अशा विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चेस तयार असल्याचं विरोधी पक्षांनी स्पष्ट केलंय. खासदार विनोद खन्ना, पी. गोवर्धन रेड्डी यांच्या निधनामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी कोणतंही काम होणार नाही. याच दिवशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत संसदेचे हे अधिवेशन चालणार आहे.