बसची दोरी तुटली आणि फरफटत गेली दुचाकी... पुढे काय घडलं पाहा थरारक व्हिडीओ
सोशल मीडियावरती देखील आपल्याला असे काही अपघाताचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे खूपच धक्कादायक असतात.
चेन्नई : आपल्याला दिवसाला रस्ता अपघाताची एक तरी बातमी किंवा व्हिडीओ समोर येतो. हे अपघात कधी चालकाच्या चूकीमुळे तर कधी, निसर्गामुळे, तर कधी प्रशासनाच्या चूकीमुळे घडतात. सोशल मीडियावरती देखील आपल्याला असे काही अपघाताचे व्हिडीओ पाहायला मिळतात जे खूपच धक्कादायक असतात आणि त्यात नक्की चूकी कोणाची हे सांगणं देखील कठीण होतं.
असाच एक अपघात चेन्नईमधील वेपरी येथे घडला, 17 ऑगस्ट रोजी झालेल्या या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. या अपघातात पोलीस आयुक्त कार्यालयात तैनात असलेला पोलिस कर्मचारी आदिसेशन गंभीर जखमी झाला आहे.
नक्की काय घडलं?
लकी ट्रॅव्हल्स नावाच्या कंपनीची खासगी बस चेन्नईतील वेपरी मार्गे जात होती तेव्हा वाहनाच्या छतावर माल बांधण्यासाठी वापरलेल्या दोरीचा एक टोक सैल झाला. दोरी व्यवस्थित बांधलेली नसल्याने असं घडलं
परिणामी, दोरीचं एक टोक बस मागे लटकू लागलं , ज्यामुळे बसच्या मागून येणाऱ्या वाहनांना या दोरीचा फटका बसत होता. त्यानंतर ही दोरी एका दुचाकीत अडकली, ज्यामुळे दुचाकी चालक आणि प्रवाशाला या दोरीने फरफट नेले, काही सेकंदात हे दोघेही खाली पडले, परंतु त्यांची स्कूटर मात्र दोरीत अडकून वेगाने पुढे गेली.
जेव्हा बसने डाव्या बाजूला वळण घेतले, तेव्हा जवळ असलेले पोलीस कर्मचारी आदिशेशनने हा सगळा गोंधळ ऐकला, तेव्हा त्यांनी पाहिले की, दुचाकी बसच्या दोरीने जास्त वेगाने ओढली जात आहे. आदिशेशन आणि दुसऱ्या लोकांनी मदत करण्यासाठी धाव घेतली. ज्यामुळे पोलिस कर्मचारी आदिशेशन यांना दुखापत झाली. परंतु आणखी काही नुकसान होण्यापूर्वीच बसला थांबवण्यात आले.