आसाम( दिसपूर) : वाह सुनबाई वाह... असे बोलण्यासाठी या सुनेने लोकांना भाग पाडले आहे. कारण या महिलेने तिच्या सासऱ्यांसाठी जे केले ते खरोखर कौतुकास्पद आहे. आपण शक्यतो सुनेला सासु-सासऱ्यांसोबत भांडताना, त्यांना घराबाहेर काढण्याची घटना ऐकली असणार. परंतु एखादी मुलगीही कदाचित आपल्या आई-वडिलांसाठी करणार नाही, असे या सूनेने आपल्या सासऱ्यांसाठी केले आहे. या सुनेन आपल्या सासऱ्यांना पाठिवर उचलून घेतले आहे आणि ती त्यांना रुग्णालयात घेऊन जात आहे. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असामच्या नगांवमधील राहणाऱ्या निहारिका दासचा हा फोटो आहे. निहारिकाचे सासरे सुपारी विक्रेते आहेत, तर तिचा नवरा सिलीगुड़ीमध्ये नोकरी करतो. 2 जूनला निहारिकाला तिच्या सासऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागली त्यानंतर तिने सासऱ्यांना रुग्मालयात घेऊन जाण्याचे ठरवले.


प्रशासकीय रुग्णालय 2 किलोमीटर लांब असल्याने निहारिकाने टॅक्सी बोलावली. पंरतु टॅक्सी वाल्याने तिला तिच्या घरापर्यंत येण्यास नकार दिला. त्यांनंतर तिला काय करावे हे सुचले नाही. घरात फक्त निहारिका आणि तिचे सासरेच असल्याने घरचं तिला मदत करणारं असं कोणी नव्हतं. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आजु-बाजूचे कोणीही तिला मदत करण्यासाठी पुढे आले नाहीत. त्यामुळे मग काहीही पर्याय समोर न  उरल्याने स्वत:च सासऱ्यांना उचलून नेण्याचा विचार केला.


तिने सासऱ्यांना उचलून घेतले आणि ती चालत टॅक्सीपर्यंत जाऊ लागली. तेव्हा तिथे उपस्थित लोकांनी तिचा फोटो काढला. इतकी लोकं तिथे होती, ज्यांनी तिचे फोटो काढले. परंतु यात वाईट गोष्ट अशी की, तेथील कोणीही. निहारिकाला मदत करण्यासाठी पुढे आले नाही.



निहारिकाने आपल्या सासऱ्यांना टॅक्सी स्टँडपर्यंत पाठीवरुन आणून टॅक्सीत बसवले आणि ती रुग्णालयात त्यांना टॅक्सीमधून घेऊन गेली आणि त्यांना भरती केले. परंतु सासऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे निहारिकाही कोरोना पॉझिटिव्ह आली.


यासगळ्यात दुर्दैव असं की, इतकी मेहनत करुन सुद्धा निहारिका तिच्या सासऱ्यांना वाचवू शकली नाही. 


लोकांनी सोशल मीडियावर निहारिकाचे आणि तिच्या शौर्याचे तोंड भरुन कौतुक केले आहे. तर बऱ्याच लोकांनी या पोस्टला आपल्या अकाउंटवरुन शेअर केले आहे.