Relationship News : (Marriage) वैवाहिक नात्यात येणारी वादळं वाढून सामंजस्य कमी झालं, समजुतदारपणाचा अभाव आला की नात्याला तडा जातो आणि पाहता पाहता नात्याची गुंतागुंत सोडवण्यासाठी थेट न्यायालयाचीच पायरी चढावी लागते. इथं (Divorce) घटस्फोट हा अंतिम टप्पा असतो, जिथं नात्याला पूर्णविराम दिला जातो. याच घटस्फोटाच्या प्रक्रियेतही काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत, ज्यामध्ये आर्थिक बाबींवर जेव्हाजेव्हा चर्चा होते तेव्हातेव्हा वाद विकोपास जाताना दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या घटस्फोटाचं असंच एक प्रकरण समोर आलं असून, इथं पत्नीनं पतीकडे घटस्फोट प्रक्रियेदरम्यान केलेली पोटगीची मागणी पाहून अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. राधा मनुकुंत असं या याचिकाकर्त्या महिलेचं नाव असून, मागील वर्षी तिनं बंगळुरू कौटुंबिक न्यायालयात यासाठी धाव घेतली होती. कायद्यानुसार न्यायालयानं महिलेचा पती, एम नरसिम्हानं तिला 50 हजार रुपये इतकी मासिक पोटगी द्यावी याविषयीचे आदेश दिले. पण, न्यायालयाचे हे आदेश मान्य नसल्याचं म्हणत या महिलेनं थेट उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. 


सदर महिलेनं ब्रँडेड कपडे, लक्झरी डिनर आणि आलिशान जीवनशैलीचा स्तर जपण्यासाठी पतीकडे थेट 6 लाख रुपयांहून अधिकची पोटगी मागितली. या मागणीसह हिंदू विवाह कायदा 1955 अंतर्गत पत्नीला विभक्त झाल्यानंतर आर्थिक आधार देण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा कसा गैरवापर केला जात आहे ही बाब अधोरेखित झाली. 


न्यायालयानं कायद्याच्याच भाषेत दिली समज... 


हिंदू विवाह कायदा 1955 मधील अनुच्छेद 24 नुसार घटस्फोटाचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना जोडीदार आर्थिक आधारासाठी मागणी करू शकतो. पण, इथं मात्र महिलेच्या मागणीनं अनेकांचेच डोळे चक्रावले. न्यायालयानं मात्र या महिलेला चांगलीच समज दिली. 


'प्रतिमहा 6,16,300 रुपये... एखाद्या व्यक्तीला इतका खर्च करावा लागतो हे तुम्ही न्यायालयापुढे सांगूच नका. एखादी व्यक्ती, एखादी महिला स्वत:साठीच इतका खर्च कसा करु शकते? तुम्हाला खर्च करायचाय तर, पैसे कमवा. पतीवर विसंबून राहू नका. तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी नाही, मुलांची काळजी घ्यायची नाही. तुम्हाला ही सर्व रक्कम स्वत:साठी हवीय. अनुच्छेद 24 चा हा मूळ हेतू नाहीय. पत्नीशी मतभेद असण्याची ही अशी शिक्षा पतीसाठी नसू शकते. आधी पटण्याजोगी कारणं द्या...'


हेसुद्धा वाचा : Indian Navy vs Merchant Navy: भारतीय नौदल, मर्चंट नेव्हीमध्ये नेमका फरक काय? कुठे मिळतो जास्त पगार?


 



इथं न्यायमूर्तींनी महिलेकडे या रकमेच्या मागणीसाठीची कारणं विचारली असता या महिलेनं हिशोबाची फोड करून सांगितल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. महिलेच्या सांगण्यानुसार सहा लाखांच्या या रकमेतून 50 हजार रुपये घड्याळं आणि चपलांसह इतर गोष्टींसाठी, 4 लाख रुपये सौंदर्य प्रसाधनं आणि औषधोपचारांसाठी खर्च होणार आहेत. महिलेच्या बोलण्यात कुठेही मुलांचं भवितव्य, त्यांच्यावरील खर्च अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नसून, फक्त आणि फक्त स्वत:च्याच आलिशान जीवनशैलीसाठी ही रक्कम मागितली जात असल्याचं स्पष्ट होत होतं. दरम्यान महिलेकडून योग्य रकमेची मागणी करण्यात आली नाही, तर तिची याचिका फेटाळण्यात येईल अशाच कठोर शब्दांमध्ये न्यायालयानं आपली भूमिका स्पष्ट केली.