डॉक्टरांकडे देवदूत म्हणून पाहिलं जातं. पण जेव्हा हाच देवदूत यमराजाचं स्वरुप घेतो, तेव्हा धक्का बसणं साहजिक असतं. उत्तर प्रदेशातील अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत 18 वर्षांची मुलगी रुग्णालयाबाहेर तडफडत आपला जीव सोडत असल्याचं दिसत आहे. आजारी असल्याने दाखल झालेल्या 18 वर्षीय मुलीवर चुकीचे उपचार करण्यात आले, यानंतर तिची प्रकृती बिघडली असता उपचार करण्याऐवजी रुग्णालयाने तिला बाहेर काढलं. एखादं सामान सोपवावं तसं रुग्णालयाने मुलीला कुटुंबाकडे सोपवलं. तरुणी रुग्णालयाबाहेर तडफडत मृत पावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 वर्षीय मुलगी दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल होती. दरम्यान, व्हिडीओत मुलगी बाईकवर बेशुद्ध अवस्थेत बसलेली असून आई-वडिलांनी तिला पकडून ठेवल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केलं आहे. आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी फरार आहेत. दरम्यान, रुग्णालयाला पोलिसांनी सील केलं आहे. 


मैनपुरीच्या करहल रोडवर असणाऱ्या राधास्वामी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. येथे 11 वीत शिकणाऱ्या 18 वर्षीय मुलीला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी तिच्यावर चुकीचे उपचार केले. दोन दिवस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडू लागली. यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी मुलीला रुग्णालयाबाहेर काढलं. 



समोर आलेल्या व्हिडीओत मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. रुग्णालयातील कर्मचारी तिला बाईकवर बसवून निघून जातात. एक व्यक्ती तिला पकडून उभा असतो. तिथे उभी असणारी महिला धायमोकळून रडताना दिसत आहे. योग्य उपचार न मिळाल्याने अखेर मुलीला तिचा जीव गमवावा लागला. 


मुलीच्या मृत्यूनंतर मृतदेह तिथेच सोडून रुग्णालयातील सर्व कर्मचारी फरार झाले असा कुटुंबाचा आरोप आहे. मुलीवर उपचार करणारा डॉक्टर रवी यादवदेखील फरार आहे. 


हे प्रकरण तापल्यानंतर आरोग्य विभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून, रुग्णालयाला टाळं ठोकण्यात आलं आहे. इतकंच नाही तर रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टर रवी यादव याच्याकडे कोणतीही डिग्री नसल्याचं समोर आलं आहे.