Fake Policeman : अधिक परतावा देण्याच्या किंवा जास्त फायदा मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक वेळा सामान्या माणसाची फसवणूक केली जाते. काहीवेळा धमकावूनही पैसे उकळले जातात. खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तर कधी तुमची जवळची व्यक्ती अडचणीत सापडल्याचं कारण देत पैसे मागितले जातात. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. या तरुणीने कॅमेरासमोर पोलिसांच्या नावाने फेक कॉल करणाऱ्याचा भांडाफोड केला आहे. या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांच्या नावाने फोन
गेल्या काही दिवसात पोलिसांच्या नावाने फोन करुन सामान्यांना लुटण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. फोन करणाऱ्या आरोपीच्या डिपीवर पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो असल्याने सामान्य माणसाकडून पटकन विश्वास ठेवला जातो. इन्स्टाग्रामवर चरणजीत कौर नावाच्या एका तरुणीने असाच एक व्हिडिओ शेअर केली आहे. चरणजीत कौरला एक फोन येतो, फोन करणाऱ्या व्यक्तीच्या डिपीवर दिल्ली पोलीस (Delhi Police) अधिकाऱ्यांचा फोटो असतो. फोन करणारा व्यक्ती आपण दिल्ली पोलस स्टेशनमधून बोलत असल्याचं सांगतो.


चरणजीत नावाची तरुणी तो फोन उचलते. यावेळी समोर आपण दिल्ली पोलिसातून बोलत असल्याचं सांगतो. तुमची बहिण एका मंत्र्याच्या मुलाला ब्लॅकमेल करत होती, या आरोपात तिला अटक करण्यात आल्याचं तो व्यक्ती तरुणीला सांगतो. तुमच्या बहिणीला सोडावयचं असल्यास 30 हजार रुपये भरावे लागतील असंही तो व्यक्ती सांगतो. तरुणी त्याला आपल्या बहिणीचं नाव विचारतो. यावर तो व्यक्ती तुमच्या बहिणीचं नाव चरणजीत कौर असल्याचं सांगत तरुणीला धमकावतो. पैसे न भरल्यास चरणजीतला तुरुंगात ठाकलं जाईल असा इशाराही तो पोलीस देतो. 


तरुणीने असा केला भांडाफोड
वास्तविक, फोन करणाऱ्या व्यक्तीने ज्या चरणजीत कौरला अटक केल्याचं सांगतोय, ती दुसरी तिसरी कोणी नाही तर जिला फोन केला तीच होती. आरोपीने खऱ्या चरणजीतला कौरला फोन केला होता. हा सर्व प्रकार चरणजतीने कॅमेरासमोर लाईव्ह केला आहे. शेवटी संतापलेल्या तरुणीने आपणच चरणजीत बोलत असल्याचं सांगत फेक कॉलचा भांडाफोड केला. 



हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. या तरुणीच्या धाडसाचं लोकांनी कौतुक केलं आहे. अशा फेक कॉलपासून लोकांनी सावध राहाण्याचं आवाहनही केलं जात आहे.