जिवाची पर्वा न करता बिल्डिंगवर चढले, खिडकीत घुसून पुरवली कॉपी; बोर्डाच्या परीक्षेत हे चाललंय काय?
Board Exam Cheating: विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी काहीजण थेट इमारतीवर चढले आहेत.
Board Exam Cheating: साधारण 15 ते 20 फुटांची सापट इमारत...त्याच्या वरच्या बाजुने 6 ते 7 खिडक्या. आतमध्ये विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतायत. तर बाहेरुन काही तरुण भिंतीवर चढलेयत.. खिडकीपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून काठीच्या आधारे चढलेयत. आणि आत बसलेल्या विद्यार्थ्यांना बाहेरुन कॉपी पुरवतायत...हे दृश्य कोणत्या सिनेमाचे नाही तर प्रत्यक्ष घडलेले आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय.
मार्चचा महिना हा बोर्डाच्या परीक्षेचा महिना असतो. या महिन्यात देशातील विविध राज्यांमध्ये दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु असतात. अशावेळी परीक्षेत धक्कादायक कॉपीचे एकापेक्षा एक प्रकार समोर येतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये परीक्षा केंद्रात पेपर लिहित असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी काहीजण थेट इमारतीवर चढले आहेत. कॉपी रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. पण अनेक ठिकाणी ते यशस्वी होताना दिसत नाही.
व्हिडीओ व्हायरल
हरियाणाच्या नूह जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये लोक जिवाची पर्वा न करता परीक्षार्थींना कॉपी करण्यासाठी मदत करतायत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात भिंतीवर चढून आत परीक्षा लिहिणाऱ्यांना कॉपी पुरवली जातेय.
नूंह जिल्ह्याच्या यासीन मेव सिनीअर सेकेंडरी शाळा आणि तावडू शहराच्या चंद्रावती शाळेत बोर्डाची परीक्षा सुरु आहे. येथे मोठ्या प्रमाणात कॉपी सुरु होती. सोशल मीडियातील फोटो, व्हिडीओ पाहून तुम्हाला प्रत्यक्षात घडलेल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. परीक्षा सुरु झाल्याच्या काही वेळातच प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सअपवच्या माध्यमातून बाहेर आले. त्यानंतर त्याची उत्तरे कॉपीच्या माध्यमातून पुरवली गेली.
फोटो काढल्याने प्रकार समोर
कॉपी पुरवणारे काहीजण भिंतीवर लटकताना दिसत आहेत. अशावेळी ते पडले असते तर त्यांच्या जिवावर बेतू शकले असते. पण जिवाची पर्वा न करता आपल्या मित्रांना कॉपी पुरवण्यात हे मग्न दिसत आहेत. परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या नागरिकांनी या घटनेचे फोटो काढल्याने हा प्रकार जगासमोर आला.