Horse Forced To Smoke Weed: उत्तराखंड (Uttarakhand) ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. चारधाम यात्रेसाठी हजारो भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होतात. भगवान शिव शंकराचे केदारनाथ (Kedarnath) हे तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. केदारनाथ हा भाविकांसाठी आस्थेचा विषय आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी केदारनाथ चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोन तरुण घोड्याला जबदस्ती गांजा किंवा विड देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. (Kedarnath Video Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत दोन तरुणांनी घोड्याचे तोंड पकडून ठेवले होते. एकाने घोड्याचे एक नाकपुडी बंद करुन ठेवली आहे. तर दुसरा तरुण दुसऱ्या नाकपुडीने जबददस्ती घोड्याला विड/ गांजा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर तो घोडा त्यांच्या तावडीतून सोडण्याची धडपड करताना दिसत आहे. मात्र तरीही ते दोघे थांबताना दिसत नाही. 


व्हायरल झालेला हा व्हिडिओ केदारनाथ धाममधील यात्रेदरम्यानचा आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर हा अमानुष प्रकार असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. ही घटना चिंताजनक असल्याची टिप्पणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. केदारनाथ मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेकजण घोड्याची सवारी बुक करतात. पण जर घोड्याचे मालक अशाप्रकारे नशेचे पदार्थ घोड्याला देत असतील तर भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कारण अशावेळी घोड्यासोबत काही गंभीर दुर्घटना घडली तर प्रवाशांनाही त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 



व्हायरल झालेला हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला असून त्यांनी आरोपींविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर पोलिसांनी ट्विट करत रिप्लाय दिला आहे. आमच्यापर्यंत व्हायरल व्हिडिओ पोहोचला असून घोड्यांना जबरदस्ती अमली पदार्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्हिडिओतील आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच, पोलिसांनी नागरिकांना एक आवाहनदेखील केलं आहे. अशा घटना निदर्शनास आल्यास त्यावर तात्काळ कारवाईसाठी जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा 112 वर फोन करुन माहिती द्या. 


अशाप्रकारे घोड्यांना अमली पदार्थ देऊ केल्यास घोडांचे आरोग्य बिघडू शकते. गेल्या काही दिवसांपासून असे व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यात प्राण्यांसोबत अमानुष प्रकार केल्याचे समोर आले आहे. केदारनाथ मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गात अनेक घोडेस्वार त्यांच्या मालकीच्या घोड्यांना अमानुष वागणूक देत असल्याचे उघड झाले आहे. घोड्यांना मारहाण करत असल्याचेही समोर आले आहे. यामुळं अनेक घोड्यांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत.