रुग्णवाहिकेअभावी चिमुकल्या भावाचा मृतदेह मांडीवर धरून ठेवण्याची वेळ, मन सुन्न करणारी घटना...
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यवस्थेची चिड येतेच पण त्या पलिकडे किती दुरावस्था आहे याचं हे उदाहरण आहे.
मुरैना : जीवाला जीव देणारा भाऊ असावा असं प्रत्येकाला वाटतं. हीच भावाची साथ या छोट्या मुलाने शेवटच्या श्वासापर्यंतच नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत निभावली आहे. अशी वेळ कधीही कोणावरही येऊ नये. पण दुर्दैवानं या 8 वर्षांच्या चिमुकल्यावर आलीय.
हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजात धस्स होईल. 8 वर्षांच्या चिमुकला आपल्या मांडीवर भावाचा मृतदेह घेऊन बसला आहे. त्याचे वडील रुग्णवाहिका शोधत आहेत. रुग्णालयाने रुग्णवाहिका न दिल्याने या कुटुंबावर ही वेळ आली. आधीच दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्यामध्ये होणारी हेळसांड पाहून एकीकडे संताप तर दुसरीकडे मन सुन्न होतं.
ही दुरावस्था आहे मध्य प्रदेशातील मुरैना परिसरातील. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यवस्थेची चिड येतेच पण त्या पलिकडे किती दुरावस्था आहे याचं हे उदाहरण आहे. या व्हिडीओमध्ये 8 वर्षांचा लहान मुलगा आपल्या 3 वर्षीय भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला आहे. यावेळी या लहानग्या जीवावर काय हाल होत असेल हे समजणं कठीण आहे.
त्याचा मनात काय सुरु असेल याची कल्पनाही आपण करु शकतं नाही. त्याला अजून जन्म आणि मरणातील फरकही कळत नसेल. अशात ज्या भावासोबत लहानाचं मोठं होण्याची स्वप्न या चिमुरड्याने पाहिली असेल. आज त्याच भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसण्याची वेळ या चिमुकल्यावर आलीय.
नेमकं काय प्रकरण?
पूजाराम जाटव हा व्यक्ती आपल्या 3 वर्षांचा मुलगा राजाला जिल्हातील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आला होता. राजाला अशक्तपणाचा त्रास होता. मात्र उपचारादरम्यान राजाचा मृत्यू झाला. निराश वडिलांनी रुग्णालयातून राजाला घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिनीची मागणी केली.
हताश वडिलांना रुग्णालयाने नकार दिला. एवढंच नव्हे तर भाड्याने वाहन खरेदी करा असा सल्लाही दिला. मग वडिलांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. राजाचं शव कुठे ठेवायचं? त्यावेळी अचानक आयुष्यात मोठ्या भावाची जबाबदारी या छोट्याशा खांद्यावर पडली.
रुग्णालयाच्या जवळील एका भिंतीजवळ गुलशनवर आपल्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन जमिनीवर बसण्याची वेळ आली. त्यानंतर वडिलांची वाहन शोधण्याची धडपड सुरु झाली.
कुठली आहे ही घटना?
मध्य प्रदेशातील ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या घटनेची सुचना एसएचओ योगेंद्र सिंह यांना मिळाली. त्यांनी रुग्णवाहिनीची सोय करुन या मुलाचा मृतदेह घरी पाठवायला मदत केली.
गेल्या 5 महिन्यात ही राज्यातील अशाप्रकारची तिसरी घटना आहे. मात्र या घटनेनंतर राजकिय नेत्यांनी एकमेकांवर ताशेरे ओढण्यास सुरू केली आहे. पण हे करण्यापेक्षा राज्यात परत अशी घटना कोणासोबत पण घडू नये यासाठी, राजकीय नेत्यांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.