Dashboard Camera Viral Video: तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन स्कॅमर्सबद्दलच्या बातम्या वाचल्या, ऐकल्या असतील. फसवणूक करुन पैसा कमवण्यासाठी लोक कोणत्याही स्तराला जातात. आपण विचारही करु शकत नाही अशा गोष्टी हे स्कॅमर्स पैसे कमवण्यासाठी करतात. असाच एक धक्कादायक प्रकार आता एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आला आहे. काही टोळ्या आता चालत्या गाड्यांसमोर उगाच उडी मारुन गाडीने धडक दिल्याचा बनाव करुन लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना गाडीमधील डॅशकॅममध्ये (Dashboard Camera) कैद झाली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालकाला अडकवण्यासाठी ही व्यक्ती गाडीसमोर आली. चालकाने आपल्याला धक्का दिला सांगून त्याच्याकडून भरपाईच्या नावाखाली पैसे उकळण्याचा या व्यक्तीचा डाव होता. कारच्या मालकाने हा सर्व प्रकार डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाल्याचं सांगत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ दक्षिण भारतामधील एका राष्ट्रीय महामार्गावरील असल्याचं व्हिडीओमधील रस्ते आणि आजूबाजूचा परिसर पाहून लक्षात येत आहे.


शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये डाव्या बाजूने एक व्यक्ती कारसमोर धावत येते आणि बोनेटवर उडी मारते. हे कृत्य करण्याआधी बऱ्याच दुरुन ही व्यक्ती कारवर लक्ष ठेऊन असल्याचं दिसते. कार जवळ येते तशी वेगाने धावत जाऊन ही व्यक्ती कारच्या बोनेटवर उडी मारते. कारने आपल्याला धडक दिली असं दाखवण्याचा या व्यक्तीचा प्रयत्न या कृत्यामधून कळून येतो.


गाडीमधील कुटुंब घाबरलं पण...


समोर घडलेला प्रकार पाहून गाडीमध्ये बसलेलं कुटुंब घाबरतं. मात्र चालक या व्यक्तीला माझ्या गाडीमध्ये डॅशकॅम असल्याचं इशाऱ्यांमध्ये सांगतो. सर्व काही रेकॉर्ड झालं आहे असं चालक या व्यक्तीला इशाऱ्यात सांगतो. खरोखरच गाडीमध्ये कॅमेरा असल्याचं या व्यक्तीला कळतं तेव्हा ती गपचूप या ठिकाणाहून निघून जाताना दिसते. "डॅशकॅम असल्याचे छोटे फायदे," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत. व्हिडीओखाली खरोखरच कारमध्ये डॅशबोर्ड कॅमेरा असणं फायद्याचं असतं असं म्हटलं आहे. 



फसवणूक करणाऱ्या अशा स्कॅमर्सला धडा शिकवण्यासाठी तसेच अपघाताच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती मिळवण्यासाठीही डॅशकॅम फारच उपयोगाचे ठरतात असं अनेकांनी म्हटलं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये डॅशकॅम हे फार सामान्यपणे वापरले जात असले तरी भारतात डॅशकॅम वापरणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.