Viral News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील एका 11 वर्षाच्या लहान मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर हंबरडा फोडणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ पाहून लोक गहिरवरले आहेत. वडिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनऊला नेण्यास सांगण्यात आलं होतं. पण पुढील 10 मिनिटात त्यांनी जीव गमावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजारी वडिलांच्या मृत्यूनंतर भावूक झालेल्या मुलाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना भावना अनावर होत आहे. व्हायरल व्हिडीओत हा चिमुरडा कोणती ट्रेन 10 मिनिटात लखनऊला पोहोचवते? अशी विचारणा करत आहे. 


लखीमपूर खेरी येथे राहणारे 54 वर्षीय रामचंद्र पांडे यांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडली होती. यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा रक्तदाब कमी असल्याने त्यांनी आपातकालीन कक्षात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती. यानंतर त्यांना तिसऱ्या माळ्यावरील कक्षात हलवण्यात आलं होतं. 



मात्र गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. पण रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी दुपारी 1 पर्यंत एकही डॉक्टर तपासणीसाठी आला नाही. यादरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडली होती. डॉक्टरांनी आल्यानंतर तपासणी केली असता त्यांना लखनऊला घेऊन जाण्यास सांगितलं. पण पुढील 10 मिनिटांत त्यांनी जीव गमावला असं नातेवाईकांनी सांगितलं आहे. 


वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा आदर्शवर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने केला. आपले वडील रुग्णालयात दाखल असताना रात्रीपासून एकही डॉक्टर तपासणीसाठी आले नसल्याचा आरोप त्याने केला आहे. 


"मृत्यूच्या 10 मिनिटं आधी आम्हाला त्यांना घेऊन लखनऊला नेण्यास सांगितलं. पण 10 मिनिटात लखनऊला घेऊन जाईल अशी कोणती ट्रेन आहे? आता माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. काहीही करुन त्यांनी परत आणा," अशी आर्त हाक त्याने दिली आहे. 



11 वर्षाच्या आदर्शचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी याप्रकरणी अहवाल मागवला आहे. तसंच दोषींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.