MP Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना दोन वर्षांनी उघड झाली आहे. एका 34 वर्षीय व्यक्तीला अर्धनग्न करत लाथाबुक्क्या, कानाखाली मारत मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्याला तोंडाने शूज उचलण्यास भाग पाडलं. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ दोन वर्षांनी व्हायरल (Viral Video) झाला आहे. यानंतर पोलिसांनी व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारवाई करत प्रमुख आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली आहे. आरोपीच्या दोन सहकाऱ्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
 
व्हायरल व्हिडीओत पीडित व्यक्तीचे हात बांधले असून, अर्धनग्न अवस्थेत उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी आरोपी त्याला सतत मारहाण करत होता. तर दुसरीकडे, पीडित व्यक्ती वारंवार दयेची मागणी करत होता. पण आरोपी काहीही ऐकून न घेता त्याचा छळ करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ रेवा जिल्ह्यातील पिपराही गावात मे 2021 रोजी रेकॉर्ड करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार संपत्तीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे. "व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही मुख्य आरोपी जवाहर सिंह (55) आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे," अशी माहिती रेवाचे पोलीस अधिक्षक विवेक सिंग यांनी दिली आहे. प्रमुख आरोपी गोंड जमातीचा सदस्य आहे. 


पोलिसांनी सांगितलं आहे की, प्रमुख आरोपी हा गावाच्या सरपंच महिलेचा पती आहे. तसंच सरकारी शाळेत क्लर्क आहे. पीडित व्यक्तीचं आरोपी जवाहर सिंगने अपहरण केलं होतं. यानंतर त्याला अर्धनग्न करत मारहाण केली आणि तोंडाने बूट उचलायला लावलं. 



जवाहर सिंह याच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदिवासी असून, उच्च जातीतील आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका आदिवासी मजूरावर लघुशंका केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सिंधी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओही घटनेच्या अनके दिवसांनी समोर आला होता. दरम्यान यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. प्रवेश शुक्ला अशी या आरोपीची ओळख पटली होती. पोलिसांनी प्रवेश शुक्ला याला बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीडित आदिवासी मजुराला घरी बोलावून त्याचा सन्मान केला. शिवराज सिंग यांनी त्याचे पाय धुतले तसंच तिलक लावत सत्कार केला होता.