`तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?`, विद्यार्थ्याने सर्वांसमोर प्रपोज केल्यानंर शिक्षिका म्हणाली, `माझंही...`, सर्वांनाच धक्का
विद्यार्थ्याने चक्क आपल्या शिक्षिकेलाच प्रपोज केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत असून विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी करत आहेत.
कोविडमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना आता ऑनलाइन क्लासेसची सवय झाली असून, अनेकजण तंत्रज्ञानाचा आधार घेतात. पण यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये होणारा थेट संवाद कुठेतरी लोप पावत चालला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये निर्माण होणारं गुरु-शिष्याचं नातंही तितकंसं घट्ट होताना दिसत नाही. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तोटे हे दोन्ही बाजूला आहेत. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी आता शिक्षकांकडे कोणत्या नजरेने पाहू लागलेत हे दिसू लागलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक विद्यार्थी थेट आपल्या शिक्षिकेला प्रपोज करुन आपल्याशी लग्न करणार का? अशी विचारणा करताना दिसत आहे.
tv1indialive या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत विद्यार्थी ऑनलाइन क्लास सुरु असताना दुसऱ्या मोबाईलवरुन व्हिडीओ रेकॉर्ड करताना दिसत आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांचे काही प्रश्न असतील तर विचारण्यास सांगते. त्यानंतर विद्यार्थी शिक्षिकेला तुमचं लग्न झालं आहे का? अशी विचारणा करतो. शिक्षिकेने नाही असं उत्तर दिल्यानंतर तो, 'मग माझं तुमच्यावर प्रेम आहे मॅडम' असं सांगतो.
शिक्षिका यानंतरही संयम पाळते आणि त्याला सांगते की, "डिअर, तसं माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे". यानंतर विद्यार्थी शिक्षिकेला मथेच थांबवतो आणि विचारतो, "तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?". विद्यार्थी शिक्षिकेला प्रपोज करत असताना इतर विद्यार्थी हसत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 1.4 मिलियन व्ह्यूज मिळाले असून ते वाढतच आहेत. या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. अनेकांनी हे अत्यंत लाजिरवाणं आणि चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
युजर्स काय म्हणत आहेत?
एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, "हे अजिबात हास्यास्पद नाही, तुम्हाला लाज वाटायला हवी". अशाच प्रकारे आणखी एकाने कमेंट करत हे लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे.
एकाने शिक्षिकेचं कौतुक केलं असून त्यांनी फार शांतपणे परिस्थिती हाताळल्याचं म्हटलं आहे. तसंच एकाने शिक्षकांनी अशा प्रश्नांवर उत्तरच द्यायला नको. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना लाज वाटायला हवी असं म्हटलं आहे. एकाने शिक्षिका विद्यार्थ्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करेल अशी आशा व्यक्त केली आहे.