उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. वायूवेगाने धावणाऱ्या एका कारने तीन तरुणांना धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की, दोन तरुणांनी जागीच जीव गमावला. तर एकजण गंभीर जखमी आहे. मृत तरुणांची ओळख पटली असून मोईन आणि अकील अशी त्यांची नावं आहेत. तर जखमी तरुणाचं नाव ताहीर आहे. ताहीर रुग्णालयात मृत्यूशी लढा देत आहे. गोरक्षनाथ पोलीस ठाण्याच्या रामनगरमध्ये हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. तिन्ही तरुण रस्त्यावरुन चालत असताना मागून अत्यंत वेगाने येणारी कार त्यांना उडवते. रविवारी रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी हा अपघात झाला. कारचा वेग ताशी 150 किमी होता असं बोललं जात आहे. 


सीसीटीव्हीत काय दिसत आहे?


सीसीटीव्हीत तीन तरुण रस्त्यावरुन चालताना दिसत आहेत. रस्त्यावर बस पार्क केलेली असून त्याच्या शेजारुन ते चालत होते. याचवेळी मागून एक कार वेगाने येते आणि तिघांना उडवते. तरुणांना काही कळण्याआधीच अपघात झालेला असतो. कारचा वेग इतका असतो की, तरुण चेंडूप्रमाणे हवेत उडवले जातात. एक तरुण तर बसपासून 100 फूट दूर जाऊन पडतो. पोलीस आता ही कार आणि चालकाचा शोध घेत आहेत. 



पोलिसांनी काय म्हटलं आहे?


या अपघातासंबंधी माहिती देताना गोरखपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी जितेंद्र कुमार सिंह यांनी सांगितलं आहे की, "या प्रकरणी कलम 125/124, 279, 337, 338, 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु आहे. कारच्या नंबरची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही".


पुढे ते म्हणाले आहेत की, तीन तरुण रस्त्यावर चालत निघाले होते. याचवेळी हा अपघात झाला. दोघेजण घटनास्थळीच ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृत्यूशी लढा देत आहे.