फूलविक्रेत्या महिलेचा मुलगा iPhone घेण्यासाठी नोटांचे बंडल घेऊन पोहोचला; पण त्याच्या आईला पाहून नेटकरी दुखावले
Viral Video: आयफोन (iPhone) मिळावा यासाठी फूलविक्रेत्या महिलेच्या मुलाने जेवण सोडलं होतं. अखेर हतबल होत महिलेने आपली कमाई त्याच्या हातात सोपवली आणि आयफोन विकत घेऊन दिला.
Viral Video: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण मागे पडू नये अशी भिती प्रत्येकाला सतावत असते. पण मग याच स्पर्धेत पुढे राहण्याच्या हेतून अनेकदा आवाक्याबाहेर जात गोष्टी खरेदी केल्या जातात. खरं तर ही गरज फक्त समाजात आपला एक स्टेटस निर्माण कऱणं इतकीच असते. आयफोन खरेदी करणं हा त्याचाच एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या आयफोन खरेदी करणं हे मध्यमवर्गीयांसाठी घऱ किंवा गाडी खरेदी कऱण्यासारखं झालं आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याचा अभिमान व्यक्त केला जातो. नुकतंच एका फूलविक्रेत्या महिलेच्या मुलाने आयफोन खरेदी केल्याचा व्हिडीओ शेअऱ केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संतापले असून, त्याच्या आईप्रती संवेदना व्यक्त करत आहेत.
दोन वेळच्या जेवणाची सोय कशी करावी या चिंतेत असणाऱ्या फूलविक्रेत्या महिलेच्या मुलाने आयफोन मिळावा यासाठी जेवण सोडलं होतं. सुरुवातीला महिलेने त्याची मागणी फेटाळून लावली होती. मात्र नंतर त्याच्या हट्टापुढे तिला गुडघे टेकावे लागले. मुलासह आयफोन खरेदी कऱण्यासाठी त्यादेखील पोहोचल्या होत्या. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फक्त आयफोन खरेदी कऱण्यासाठी हट्टाला पेटलेल्या या तरुणावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. आईने आयफोन खरेदी करुन देण्यास नकरा दिला असता त्याने तीन दिवसांपासून जेवण सोडलं होतं.
व्हिडीओत नेमकं काय?
Incognito या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला मुलगा आपल्या आईसह दुकानात उभा दिसत आहे. दोघेही आयफोन खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली असता महिलेने सांगितलं की, "मी मंदिराबाहेर फुलं विकते. आयफोन हवा असल्याने माझ्या मुलाने तीन दिवसांपासून काही खाल्लेलं नाही".
मुलगा जेवत नसल्याने महिलेने हार मानली आणि त्याला आयफोन खरेदी कऱण्यासाठी पैसे दिले. पण तिने पैसे देताना मुलाला एक अटही घातली आहेत. आयफोनसाठी जितके पैसे खर्च केले आहेत, तितके पैसे कमावून मला परत करायचे असं तिने मुलाला सांगितलं आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्याच्यावर कमेंट करत आहेत. अनेकांनी दोन पिढींमधील फरकाची तुलना केली आहे. अनेकांनी आपल्याला त्या आईचा चेहरा पाहून वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे.
या घटनेने अनेक सोशल मीडिया युजर्सना तरुण पिढीची मूल्ये आणि प्राधान्यक्रम, तसंच अशा परिस्थितींना कारणीभूत असलेल्या सामाजिक दबावांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.