ताशी 140 किमीच्या वेगाने पळवली कार, दुचाकीला उडवलं, म्हणाला `हे माझं रोजचं आहे`; VIDEO तुफान व्हायरल
Viral Video: व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुण ताशी 140 किमीच्या वेगाने बेदरकारपणे कार चालवताना दिसत आहे. मागे बसलेला प्रवासी हे सर्व शूट करत असताना त्याच्या शेजारी बसलेली तरुणी गाडी हळू चालवण्यास सांगत असल्याचं दिसत आहे.
रस्त्यावर वाहन चालवताना आपल्यासह रस्त्यावरुन चालणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही चालकावर असते. वाहन बेदरकापरपणे चालवताना आपण इतरांचा जीवही धोक्यात घालत असतो याची जाणीव काही चालकांना नसते. काहींना तर अपघात झाल्यानंतर पश्चातापही होत नाही. हिट अँड रनच्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान चालक किती बेजबाबदार असू शकतो याचा प्रत्यय देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही संताप होईल.
हरियाणामधील रस्त्यावर एक तरुण अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. इतकंच नाही तर कार पळवताना तो एका दुचाकीला धडक देतो आणि याबद्दल काही खंतही व्यक्त करत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चालक तब्बल ताशी 140 किमी वेगाने कार चालवत असल्याचं दिसत आहे.
व्हिडीओत त्याचे सह-प्रवासी गाडीचा वेग कमी करण्यास सांगत असल्याचं ऐकू येत आहे. पण रस्त्यावर वाहनांची गर्दी असतानाही चालक मात्र वेग कमी करण्यास नकार देतो. रजत दलाल असं या इन्फ्लुएन्सरचं नाव असल्याची माहिती दीपिका भारद्वाज यांनी दिली आहे. गाडी वेगात चालवत असताना तो एका दुचाकीला धडकही देतो. "तो पडला, ठीक आहे काही होत नाही. हे रोजचं आहे मॅडम," असं तो यानंतर सांगत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट करत आपला संताप व्यक्त करत आहेत.
"नियमित गुन्हेगार #RajatDalalPsycho एका व्यस्त शहरातील महामार्गावर 143Kmph वेगाने गाडी चालवत दुचाकीस्वाराला धडक देतो," असं एकाने एक्सवर लिहिलं आहे. मागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओला 6.5 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत.
दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही त्याची दखल घेतली. फरिदाबाद पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, "तपास सुरु आहे. दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल".
दरम्यान अनेकांनी चालकाला अटक करण्याची मागणी केली आहे. "याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे. हा समाजासाठी धोका आहे. प्रशासनातील कोणीतरी दखल घेईल अशी आशा आहे," असं एकजण म्हणाला आहे. तर एकाने याच्यावर आयुष्यभरासाठी वाहन चालवण्याची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. तर एकाने माणसं मारणं याचं रोजचं काम आहे का? अशी विचारणा करत संताप व्यक्त केला आहे.
एका रिपोर्टनुसार, फरीदाबाद पोलीस रजत दलालला बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल चालान जारी करत आहेत. एनएचपीसी मेट्रो स्टेशनजवळ हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.