माणसांची वस्ती वाढत गेली तसंतशी जंगलं नष्ट होत गेली. माणसांनी उभारलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे प्राणी भक्ष्य शोधण्यासाठी शहरात फिरु लागले. यामुळे मानव आणि प्राणी असा संघर्षच काही ठिकाणी उभा राहिला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकांना भीतीच्या छायेखाली जगावं लागत आहे. असंच काहीसं उत्तराखंडच्या बागेश्वर जनपद येथील कठायतबाडा क्षेत्रात सुरु आहे. याचं कारण येथील रहिवासी भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर हा बिबट्या चक्क एका मॉलमध्ये घुसल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. एका कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या दबक्या पावलांनी त्याचा पाठलाग करत असल्याचं या सीसीटीव्हीत दिसत आहे. कुत्रा पायऱ्यांवरुन चालत असताना त्याला आपल्या मागे बिबट्या असल्याची काहीच कल्पना नसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बागेश्वर जिल्हा मुख्यालयाच्या कठायतबाडा क्षेत्रात असणाऱ्या 99 मॉलचे मालक मदन मोहन यांनी सांगितलं की, 12 सप्टेंबरच्या सकाळी मी दुकानात पोहोचलो असता बाहेर सगळं सामान विखुरलेलं होतं. मला दुकानात चोरी झाली आहे असं वाटलं. यामुळे मी दुकानात असणारं सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली होती. 


मदन मोहन यांना सीसीटीव्हीत चोर दिसतील अशी अपेक्षा होती. पण असं काहीच दिसलं नाही. पण सीसीटीव्हीत जे काही दिसलं ते पाहून त्यांच्या अंगाचा थरकापच उडाला. कारण सीसीटीव्हीत त्यांना चक्क एक बिबट्या दिसत होती. हा बिबट्या एका भटक्या कुत्र्याचा पाठलाग करत मॉलमध्ये पोहोचला होता. कुत्रा पायऱ्यांवरुन चालत असताना बिबट्या शिकारीच्या हेतूने दबक्या पावलांनी त्याच्या मागे चालत होता. 



दरम्यान मॉलमध्ये बिबट्या दिसल्याने सर्व दुकानदार घाबरले असल्याचं मदन मोहन यांनी सांगितलं आहे. मदन मोहन म्हणाले की, संध्याकाळ झाल्यानंतर मी लवकर घऱी गेले होते. कारण मॉलमध्ये बिबट्या दिसल्याचं बोललं जात होतं. सीसीटीव्हीने याला दुजोरा दिला आहे. यानंतर आम्ही सर्वजण घाबरलो आहोत. आम्ही वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. 


गस्त वाढवली आहे - वन अधिकारी


याप्रकरणी वन अधिकारी एस एस करायत यांनी सांगितलं आहे की, हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला की बिबटे शहराच्या दिशेने जाऊ लागतात. आम्ही या परिसरांमध्ये कर्मचाऱ्यांची गस्त वाढवली आहे. तसंच पालिकेला शहरभरर रस्त्यांच्या शेजारी असणाऱ्या झाडी कापण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन बिबट्याला लपण्यास जागा मिळणार नाही.