प्रेशर कुकरच्या स्फोटामुळे किचन उद्ध्वस्त; तुमची `ही` एक छोटीशी चूक पडेल महागात
पंजाबमध्ये एका घरात प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटका इतका जबरदस्त होता की, शेजारीदेखील आवाजाने धावत पोहोचले होते.
पंजाबच्या पटियाला येथे एका घरात प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. हा स्फोट घरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान ही घटना घडली तेव्हा घऱात 5 सदस्य उपस्थित होते. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. पण सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
30 सेकंदाचा हा व्हिडीओ घरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. जेवणाची वेळ झाली असल्याने घरातील महिला स्वयंपाक करत होत्या. दोन महिला किचनमधील कट्ट्याजवळ उभ्या दिसत आहेत. तर इतरजण टेबलवर जेवणाची वाट पाहत थांबलेले असतात. तसंच लहान मुलगा घरात चेंडूसह खेळतानाही सीसीटीव्हीत दिसत आहे. घऱात सर्व काही सुरळीत सुरु असताना पुढच्या सेकंदाला काय होणार याचे याची त्यांना कल्पनाही केलेली नसते.
काही सेकंदाने प्रेशर कुकरचा स्फोट होतो आणि थेट छतावर जाऊन आदळतो. कुकर आदळल्याने छताचाही काही भाग खाली कोसळतो. याशिवाय फर्निचरचही नुकसान होतं.
प्रेशर कुकरचा स्फोट झाल्यानंतर काही वेळासाठी कुटुंबाला नेमकं काय झालं आहे हे समजत नाही. स्फोटानंतर घरभर धूर पसरतो आणि घाबरलेलं कुटुंब सुरक्षित ठिकाणं गाठण्याचा प्रयत्न करतं. किचनमधील चिमनीदेखील यावेळी दोन महिलांच्या मधोमध येऊन कोसळते. यानंतर त्या कान बंद करुन घऱाबाहेर जातात. तसंच इतरही लोक घराबाहेर शिड्यांवरुन जाताना दिसत आहेत.
या स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सुदैवाने कुटुंबाला काही इजा झालेली नाही. सहसा, जेव्हा शिटी अन्नाकडून ब्लॉक केली जाते आणि वाफेला बाहेर पडण्यासाठी जागा नसते तेव्हा भांडं गरम झाल्यानंतर स्फोट होतो.
ऑगस्टमध्ये अशाच प्रकारे झालेल्या कूकरच्या स्फोटात जयपूरमध्ये एका 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. स्फोट झालेल्या भांड्याचे काही भाग तिच्या शरीरावर आणि चेहऱ्याला चिकटले होते. त्यामुळे ती गंभीर भाजली होती. स्फोट झाला तेव्हा महिला घरात एकटीच होती. शेजाऱ्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.