मद्यपान हे जेव्हा एका पातळीच्या बाहेर केलं जातं, तेव्हा आपण काय करत आहोत हे त्या व्यक्तीला समजत नाही. अनेक गुन्हे हे दारुच्या नशेत केले जातात. यामुळेच मद्यपान केल्यानंतर गाडी चालवण्यापासून ते अनेक गोष्टींना प्रतिबंध घातला जातो. दारुच्या नशेत एखादी व्यक्ती कोणत्या पातळीला जाऊ शकते हे दाखवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत एक व्यक्ती अजगर गळ्यात लटकवून पेट्रोल पंपावर पोहोचला होता. यानंतर पुढे जे काही झालं ते पाहून सर्वजण हादरले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळच्या कन्नूर येथे पेट्रोल पंपावर कर्मचारी काम करत असतानाच एक दारुडा तिथे आला. चंद्रन अशी त्याची ओळख पटली आहे. त्याने दारुच्या नशेत गळ्यात चक्क अजगराला लटकवलेलं होतं. हे दृश्य पाहिल्यानंतर उपस्थितांना धक्काच बसला. यावेळी तो दारुडा तेथील लोकांना माझे फोटो काढा अशी विनंती करु लागला. पेट्रोल पंपावरील कर्मचारी अभिषेकने सांगितलं की, चंद्रन पूर्णपणे दारुच्या नशेत होता आणि त्याने गळ्यात अजगर लटकवलेला होता.



"गळ्याभोवती अजगर लकटवेल्या स्थितीत त्याला फोटो काढून घ्यायचा होता. तो दारुच्या नशेत असल्याने त्याला कदाचित आपण किती मोठा धोका पत्करला आहे याची जाणीव नव्हती. यानंतर काही वेळातच अजगराने त्याच्या गळ्याभोवती विळखा आवळला. यानंतर चंद्रन खाली कोसळला," अशी माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे. 


"मी कधीच सापाला समोर पाहिलेलं नाही. पण अजगराने विळखा आवळल्यानंतर चंद्रनची होणारी झटापट पाहून मी एक गोणी घेऊन त्याच्या दिशेने धावत गेलो. चंद्रन अक्षरश: तडफडत होता. अखेर मी अजगराची शेपटी पकडून त्याला ओढलं. यानंतर त्याने विळखा सैल केला आणि तेथून सरपटत निघून गेला," असं अभिषेकने सांगितलं. अभिषेकने यावेळी आपण स्वत:ही फार घाबरलो होतो अशी माहिती दिली. मी कधीच सापाला इतक्या जवळून पाहिलेलं नसतानाही एक जीव वाचवण्यासाठी आपल्या हिंमत आली आणि पुढे गेलो असं सांगितलं.