मुंबई : देशात दररोज रेल्वे अपघात होत असतात. यापैकी बहुतेक अपघात घडतात ज्यामध्ये लोकांचा निष्काळजीपणा हे सर्वात मोठे कारण आहे. रेल्वे रुळ ओलांडण्यावर बंदी घातलेली असतानाही लोक ते ओलांडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ते अपघाताला बळी पडतात. अनेक वेळा रेल्वे प्लॅटफॉर्मवरही लोक निष्काळजीपणा करतात, त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून घसरून रेल्वे रुळावर पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तेथे उपस्थित आरपीएफ जवानांनी त्याचा जीव वाचवला आहे.


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी एक व्यक्ती रेल्वे रुळावर उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु तेवढ्यात ट्रेन जवळ येत असते, तेव्हा हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेव्हा तो पाय घसरुन खाली पडतो. ही घटना खरोखरंच अंगावर काटा आणणारी आहे.


समोरुन ट्रेन येताना आणि या व्यक्तीला पडलेलं पाहून काही RPF जवान धावून आले, तेव्हाच प्लॅटफॉर्मवर उभा असलेले दोन RPF जवान देखील या व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले आणि अखेर ट्रेन तेथे येण्याच्या काही सेकंदापूर्वीच या तरुणाला तेथून बाहेर काढण्यात आलं.



हे सगळं घडताना थोडा जरी उशीर झाला असता तर त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकला असता. मात्र जवानांनी वेळीच चपळाई दाखवत त्यांचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवर लिहिलेल्या कॅप्शननुसार, ही घटना बंगळुरूमधील केआर रेल्वे स्टेशनची आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला 16 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत आणि जोरदार शेअरही करत आहेत.