नवी दिल्ली :  दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरूद्ध देशभर चर्चा सुरू आहे. दलितांवरील अत्याचार ही देशातील खरोखरच गंभीर मुद्दा आहे. पण, अशातही समाजातील दरी कमी करण्यासाठी एक पाऊल पुढे पडत असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आहे हैदराबाद येथील. इथल्या चिल्कुर बालाजी मंदिरातील पुजारी सी एस रंगराजन यांनी याबाबत महत्वाचे पाऊल उचलले आहे. रंगराजन यांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका दलित नवरदेवाला चक्क आपल्या खांद्यावर बसवून मंदिराभोवती फेरे घेतले. तसेच त्याची गळाभेटही गेतली. 


सामाजिक संदेश देण्यासाठी केली कृती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुजारी रंगराजन यांनी सांगितले की, नवरदेवाने मंदिराभोवती नवरेदेवाने खांद्यावर बसून फेरे घ्यायची सुमारे २७०० वर्षांपूर्वीपासूनची प्रथा आहे. ही परंपरा सनातन धर्मातला खरा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची आहे. या परंपरेचा वापर करूनच मी दलित नवरदेवाला आपल्या खांद्यावर घेतले आणि सनातन धर्मात असलेली जातीय दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. सध्यास्थितीत देशातील काही लोक आपल्या स्वर्थासाठी देशातील वातावरण खराब करत असल्याचेही रंगराजन यांनी म्हटले.


आजही दलितांना मिळते वाईट वागणूक


दरम्यान, या घटनेनंतर नवरदेव आदित्य पारश्रीने सांगितले की, केवळ दलित असल्याच्या कारणावरून मला आणि माझ्या परिवाराला समाजाकडून आलेल्या अत्यंत वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. दलितांना आजही अनेक मंदिरांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जाते. आशा आहे की, पुजाऱ्यांनी उचललेले पाऊल पाहून समाजातील इतर घटकही पुढे येतील आणि दिलित सवर्ण हा समाजातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करतील.



व्हिडिओ व्हायरल


महत्त्वाचे असे की, चेगोंडी चंद्रशेखर नावाच्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओही फेसबुकवर शेअर केला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे. अनेक लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच, त्याला लाईकही करत आहेत.