VIRAL VIDEO : पुराच्या पाण्यात दिसला खाकीतला `वसुदेव`
स्वतःचा जीव धोक्यात घालून गोविंद यांनी चिमुरडीची पुराच्या पाण्यातून सुटका केली
वडोदरा, गुजरात : गुजरातमधील पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन जिवाचं रान करताना दिसतंय. खाकीतली माणुसकी दाखवणारा असाच एक व्हिडिओ वडोदरामधून समोर आलाय. एका पोलीस अधिकाऱ्यांनं ४५ दिवसांच्या मुलीला अक्षरक्षः टोपलीत घालून पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. हा व्हि़डिओ पाहून लोकांना वसुदेवाची आठवण झालीय.
वसुदेवानं बाळकृष्णाला गोकुळात टोपलीत भरून पुराच्या पाण्य़ातून गोकुळात नेल्याची पौराणिक कथा आपण आपापल्या आई आणि आजीकडून ऐकली असेल. पण गुजरातच्या बडोद्यात एक पोलीस अधिकारी दीड महिन्याच्या चिमुरडीसाठी वसुदेव बनून आला होता. बडोद्यातल्या देवीपुरा भागात जवळपास पन्नास लोकं पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चावडा यांनी ही माहिती मिळताच गोविंदपुऱ्याकडं धाव घेतली.
पुरात अडकलेल्या माणसांच्या सुटकेसाठी गोविंद पाण्यात उतरले. ज्या घरात पाणी शिरलं होतं. त्या घरात दीड महिन्याची एक चिमुकलीही होती. गोविंद चावडा यांनी तिथं तरंगत असलेली एक प्लास्टिकची टोपली दिसली. त्यांनी एका टॉवेलमध्ये गुंडाळून मुलीला टोपलीत ठेवलं. टोपली डोक्यावर घेऊन त्यांनी गळाभर पाण्यातून दोरीच्या सहाय्यानं बालिकेला सुरक्षित स्थळी आणलं.
वसुदेवांनी बाळकृष्णाला टोपलीत घालून पुराच्या पाण्यातून गोकुळात नेलं होतं. गोविंद यांची त्या मुलीशी ओळख ना पाळख... पण तरीही स्वतःचा जीव धोक्यात घालून गोविंद यांनी चिमुरडीची पुराच्या पाण्यातून सुटका केली. एरव्ही पोलिसांवर संवेदनशून्यतेचा आरोप होतो. पण गोविंद यांनी पुरातून चिमुरडीला वाचवून खाकीतही देवदूत असतात हे दाखवून दिलंय.