नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर विश्व हिंदू परिषदेतर्फे (VHP) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 2019 संपेपर्यंत वीएचपीतर्फे राम मंदिराच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचे अभियान न चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिर हा निवडणूकीचा मुद्दा बनू नये अशी यामागची धारणा असल्याचे सांगण्यात येत आहे. पण महत्त्वाची बाब अशी आहे की, कुंभमध्ये झालेल्या धर्मसभेतील बैठकीत अयोध्येत राम मंदिर होईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा प्रस्ताव साधुसंतानी संमत केला आहे. अयोध्या राम मंदिरसाठी सुरू असलेली चळवळ आम्ही लोकसभा निवडणूकी पर्यंत थांबवत असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव सुरेंद्र जैन यांनी सांगितले. 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राम मंदिर मुद्दा आमची आस्था आणि पवित्रतेशी जोडला गेला आहे. त्यामुळे हा निवडणूकीचा मुद्दा बनावा असे आम्हाला वाटत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोणत्या विशेष पक्षाला राजकारणात फायदा मिळावा यासाठी राम मंदीर अभियान सुरू केल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. अशावेळी आम्ही कोणत्या राजकीय पक्षाची कोंडी करु इच्छित नाही. हा एक पवित्र मुद्दा असल्याने आम्ही याला राजकारणापासून दूर ठेवू इच्छितो. लोकसभा निवडणूकी दरम्यान कोणतेही आंदोलन झाल्यास त्याला राजकारणाशी जोडण्यात येते. म्हणून चार महिने आम्ही राम मंदिर प्रकरणी कोणतेही आंदोलन चालवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 



निवडणूकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होते. अशाप्रकराच्या आंदोलनानंतर विनाकारण आंदोलन आणि वाद निर्माण होतात. त्यामुळे लोकशाहीचा सन्मान करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने हा निर्णय घेतल्याचे सुरेंद्र जैन यांनी सांगितले.


शिवसेनेची टीका 



अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदूत्त्ववादी संघटनांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेनेने अनेक प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यावर टीका केली आहे. राम मंदिराचा विषय तूर्त बाजूला ठेवण्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे. त्यावरूनच शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली. निवडणुकीनंतर राम मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी रक्त, बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.