पणजी : गोव्यामधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना गोव्याचं नेतृत्व दिलं जायची शक्यता आहे. १७ तारखेला दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला राणे यांच्या बरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर तसंच गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाईही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान गोव्यामध्ये काँग्रेसचे २ आमदारही फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे सध्या आजारी आहेत. मनोहर पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर रविवारी विशेष विमानानं गोव्यामध्ये आणण्यात आलंय. पर्रिकर यांना १५ सप्टेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र त्यानंतर तपासणीअंती त्यांना रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतरच गोव्यातल्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु झाल्या.


पुढले काही दिवस पर्रिकर पणजीमधल्या त्यांच्या खासगी निवासस्थानी राहतील, अशी माहिती आहे. पर्रिकरांनी शनिवारीच गोवा भाजपा कोअर कमिटीची एम्समध्येच बैठक घेतली होती.