पणजी : काँग्रेसने राफेलप्रश्नी मनोहर पर्रिकर यांच्यावर केलेल्या आरोपाचे गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी खंडन केले आहे. काँग्रेसने उल्लेख केलेली संभाषण टेप हा खोडसाळपणाचा प्रकार आहे. पर्रिकर यांचा कधीही याप्रकरणात संबध नव्हता असाही खुलासा विश्वजीत राणे यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या या आरोपावरुन गोव्यात भाजपने आक्रमक भूमिका होत चौकशीची मागणी केली आहे. राणे यांनी या संबंधात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. 'त्यांनी म्हटलं की, हा एक डॉक्टरेड ऑडियो आहे. या विषयावर माझी कोणासोबतची काहीही चर्चा झालेली नाही.'



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफेल कराराप्रकरणी काँग्रेसने गोव्यातील भाजप सरकारच्या मंत्र्यांची ऑडिओ क्लिप जारी केली आहे. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यातील राफेल प्रकरणावरील ऑडिओ क्लिप समोर आली आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ही क्लिप माध्यमांसमोर आणली. राफेल करारासंबंधी साऱ्या फाईल माझ्याकडे असल्याचे यामध्ये पर्रिकर विश्वजीत राणेंना सांगत असल्याचे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. 


राफेलचे कंत्राट अंबानींनाच मिळावे ही अट पंतप्रधान मोदींनीच ठेवल्याचे पर्रिकरांनी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. या सर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे असे सुरजेवाला यांनी सांगितले आहे. १० एप्रिल २०१५ ला फ्रांसमध्ये राफेल खरेदीची एकतर्फी घोषणा झाली तेव्हा तत्कालीन संरक्षणमंत्री पर्रिकर हे गोव्यामध्ये मासे खरेदी करत होते. प्रातिनिधिक मंडळात पर्रिकर सहभागी नव्हते तर सोबत अंबानी गेले होते असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.