पुलवामा हल्ल्याला `दुर्घटना` म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला माजी सेना प्रमुखांनी फटकारलं
`पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह`
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्दिजय सिंह यांनी एक वादग्रस्त ट्विट केलंय. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना 'दुर्घटना' असा शब्द वापरलाय. तसंच त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या बालाकोट भागात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलंय. त्यावर माजी सेना प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह यांनी दिग्विजय सिंह यांना चांगलंच फटकारलंय.
'पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुसेनें केलेल्या एअर स्ट्राईकवर परदेशी मीडियाकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे' असं ट्विट दिग्दिवज सिंह यांनी केलं.
यावर, दिग्विजय सिंह यांना प्रत्यूत्तर देताना जनरल (रिटायर्ड) व्ही के सिंह यांनी 'जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला ही घटना दुर्घटना होती की हल्ला'... इथवरचं ते थांबले नाहीत तर त्यांनी 'राजीव गांधींची हत्या, दुर्घटना होती की दहशतवादी घटना? याचं उत्तर मला दिग्विजय सिंग यांनी द्यावं बाकीच्या गोष्टी नंतर बोलू' असं म्हणत दिग्विजय सिंह यांना अडचणीत आणलंय.
'वायुसेनेवर प्रश्नचिन्ह नाही तर सरकारच्या दाव्यांवर'
७२ वर्षीय राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी यापूर्वीही 'मी पाकिस्तान स्थित दहशतवादी ठिकाणांवर भारतीय वायुसेनेनं केलेल्या कारवाईवर कोणतंही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. परंतु, एखाद्या खुल्या जागेत झालेल्या कोणत्याही घटनाक्रमबद्दल सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोटो समोर येतात. अमेरिका सरकारनंही ओसामा बिन लादेनबद्दल ज्या पद्धतीनं जगासमोर पुरावे सादर केले होते त्याचपद्धतीनं भारत सरकारनंही पुरावे द्यायला हवेत' असं एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं.