वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वारणसीत मोदींविरोधात तब्बल १०१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र ईव्हीएममध्ये मतदानासाठी ६४ उमेदवारांची कमाल मर्यादा आहे. त्यामुळे उर्वरित उमेदवारांचा प्रश्न सोडवण्यासाठी मतपत्रिकेचा आधार घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गुरुदासपूरचे भाजप उमेदवार सनी देओल यांच्या चुलत भावाने सनीच्या प्रचारासाठी रणमैदानात उडी घेतलीय. दीप संधू यानं सनी देओलसाठी प्रचार सुरू केला. प्रचाराची सुरुवात त्यानं गुरूद्वारात दर्शन घेऊन केली. पंजाबी इंडस्ट्रीचा सुपरस्टार म्हणून दीप संधूची ओळख आहे.


गंभीर विरोधात कशाच्या आधारे तक्रार?


तर दुसरीकडे माजी क्रिकेटर आणि भाजपकडून निवडणूक लढवणारे गौतम गंभीर यांच्या दोन मतदान ओळखपत्राबाबत दिल्ली न्यायालयाने तक्रारकर्ते आणि आपचे नेत्या आतिशी मार्लेना यांना कागदपत्र आणि माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारकर्त्यांनी कोणत्या आधारे ही तक्रार केली आहे, असा सवालही न्यायाल्याने उपस्थित केला आहे.


मथुरेतलं मतदान झाल्यानंतर हेमा मालिनी आता प्रचारासाठी निघाल्यात. हेमा मालिनी यांनी रांचीतले उमेदवार संजय सेठ यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी हेमा मालिनी यांना पाहण्यासाठी रांचीतल्या जनतेनं गर्दी केली होती. हेमा मालिनींनी सभेत भाजपाला बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन केलं.


भाजपवर विरोधकांचा आरोप


वीर जवानांच्या हौतात्म्याचा भाजप लोकसभा निवडणुकीसाठी सोईने वापर करत असल्याचा आरोप, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी बाराबंकीमध्ये केला. देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत, सोबतच सीबीआय, ईडी, आयकर यासारख्या स्वायत्त संस्थांनाही भाजपा सरकारमुळे धोका निर्माण झाला असल्याचा आरोप, मायावतींनी केला. 


तृणमूल काँग्रेसचे चाळीस आमदार काय एकही आमदार तुमच्यासोबत येणार नाही अशा शब्दांत, टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावलाय. काल पश्चिम बंगालमधल्या प्रचारसभेत २३ मे नंतर टीएमसीचे ४० आमदार आपल्याकडे येणार असल्याचं मोदींनी म्हंटलं होतं.