Supreme Court : विधी महाविद्यालयाच्या (law College) मुख्याध्यापकांना जामीन देण्यास विरोध करणाऱ्या मध्य प्रदेश (Madhya Pradesh) पोलिसांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)  ताशेरे ओढले आहेत. लायब्ररीत (library) पुस्तक सापडल्यानंतर मुख्याध्यापकांना अटक करायची का? असा सवाल कोर्टाने केला आहे. इंदौरच्या लॉ कॉलेजमध्ये सापडलेले पुस्तक हिंदूफोबिक असल्याचे म्हणत महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मुख्याध्यापकांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला होता. याविरोधात मध्य प्रदेश पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. न्यू लॉ कॉलेज, निवृत्त मुख्याध्यापक डॉ. इनामूर रहमान यांना अटकेपासून संरक्षण देताना सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश पोलिसांना फटाकरले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेश हायकोर्टाने इनामूर रहमान यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होता. यावर सुनावणी करताना कोर्टाने 16 डिसेंबरला त्यांना दिलासा दिला होता. या निर्णयाविरोधात मध्य प्रदेश पोलिसांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली, तेव्हा मध्य प्रदेश पोलिसांच्या युक्तिवादाने संतप्त झालेल्या सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी त्यांना खडे बोल सुनावले. 


"राज्याने काही गंभीर कामात लक्ष दिले पाहिजे. ते महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. त्यांना अटक का करायची? वाचनालयात एक पुस्तक सापडले आहे, ज्यामध्ये धार्मिक बाबींबद्दल बोलले जात आहे. हे पुस्तक 2014 मध्ये विकत घेतले होते आणि आज त्यांना अटक करण्याचे प्रयत्न का केले जात आहेत? तुम्ही गंभीर आहात का?," असा सवाल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केला.


दुसरीकडे हे पुस्तक फक्त वाचनालयात नाही तर मुख्याध्यापक त्यातून विद्यार्थ्यांना शिकवत होते असा दावा सरकारी वकिलांनी केला. मात्र प्रत्यक्षात एलएलएमच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या पुस्तकात निराधार तथ्ये देण्यात आली असून अनेक गोष्टी देशविरोधी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. हे देशाच्या अखंडतेच्या विरोधात आहे आणि जातीय सलोखाही दुखावणारे आहे, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले होते. तर मुख्याध्यापकांनी मला हे पुस्तक वाचनायलात ठेवले होते हे माहिती नाही असे म्हटले होते.