नवी दिल्ली : कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय नाही, त्यामुळे डोकलामच्या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा काढावा लागेल, असं वक्तव्य परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेमध्ये केलं आहे. डोकलामच्या प्रश्नावर राज्यसभेमध्ये आज वादळी चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चर्चेवेळी सुषमा स्वराज यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी सुषमा स्वराज यांनी जवाहरलाल नेहरू आणि राहुल गांधींवरही टीका केली. सुषमा स्वराज यांनी १९५९मध्ये नेहरूंनी संसदेत केलेल्या भाषणाचाही उल्लेख केला. सिक्कीम आणि भूटानची जबाबदारी भारताची आहे, असं नेहरू म्हणाले होते. पण तेव्हा सिक्कीमची परिस्थिती आज आहे तशी नव्हती, असं स्वराज म्हणाल्या.


पंडित नेहरूंनी जगात स्वत:साठी मान-सन्मान कमवला पण मोदींनी देशासाठी कमवला असं वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं. तसंच १७ वर्षांमध्ये एकही पंतप्रधान नेपाळमध्ये गेला नसताना मोदी दोनवेळा नेपाळला गेल्याची आठवण स्वराज यांनी करून दिली. नेपाळमध्ये भूकंप आला तेव्हा भारतच पहिले मदतीला धावून गेल्याचं स्वराज म्हणाल्या.


आपल्या भाषणामध्ये सुषमांनी राहुल गांधींवरही टीका केली. चीनच्या मुद्द्यावर भारत सरकारकडून समजून घेण्याच्याऐवजी राहुल गांधी चीनच्या राजदूतांना का भेटले असा सवालही सुषमा स्वराज यांनी उपस्थित केला.