इस्तंबुल: फॅशनच्या दुनियेतील कॅटवॉक हा शब्द सर्वांनाच परिचित असेल. मात्र, तुर्की येथील एका फॅशन शोमध्ये एका मांजरीने केलेले 'कॅटवॉक' सध्या चांगलेच चर्चेत आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्की येथील एसमोड इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये हा प्रकार घडला. यावेळी मॉडेल्सचा रॅम्पवॉक सुरु असताना एक मांजर अचानकपणे रॅम्पवर अवतरली. एरवीदेखील मांजर हा स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागणार प्राणी म्हणून ओळखला जातो. याच वृत्तीला अनुसरून ही मांजर रॅम्पवर आल्यानंतर स्वत:च्याच धुंदीत होती. आजुबाजूला बसलेले लोक आणि रॅम्पवरून चालणाऱ्या मॉडेल्स याची तिला फारशी फिकीर नव्हती. 


सुरुवातीला काही वेळ ही मांजर रॅम्पवर अंग चाटत बसली होती. काही वेळानंतर तिने रॅम्पवरून चालणाऱ्या मॉडेल्सचे पाय पकडण्याचाही प्रयत्न केला. रॅम्पवर प्रवेश केल्यानंतर काही मॉडेल्सना अचानक मांजरीला पाहून आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्यांनीही व्यवसायिकपणा दाखवत फॅशन शो सुरु ठेवला. एव्हाना मांजरीच्या लीला पाहून प्रेक्षकांमध्ये चांगलाच हशा पिकला. यानंतर ही मांजर एखाद्या मॉडेलप्रमाणे दिमाखात रॅम्पच्या पुढच्या भागापर्यंत चालत गेली आणि खाली उतरली.