रायपूर: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी छत्तीसगढ येथे राष्ट्रीय आदिवासी नृत्य संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना राहुल गांधी यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. एरवी राजकारणाचा प्रांत सोडला तर राहुल गांधी यांचा स्वभाव साधारण बुजरा म्हणावा असा आहे. किंबहुना खासगी आयुष्याविषयी गांधी घराणे मौन बाळगणेच पसंत करते. मात्र, आजच्या आदिवासी नृत्य संमेलनावेळी उपस्थितांना राहुल गांधी यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. यावेळी राहुल गांधी आदिवासींसोबत चक्क नाचले. डोक्यावर आदिवसींचा पारंपरिक मुकूट आणि गळ्यात ढोल अशा अवतारात राहुल यांनी लोकगीतावर फेर धरला. राहुल गांधी यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीम व्हायरल झाल्यानंतर मोदी म्हणाले 'बिनधास्त माझी थट्टा करा'


या कार्यक्रमाला लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमारी, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. हे सर्वजण राहुल गांधी यांच्यासोबत नृत्यात सामील झाले. छत्तीसगढमध्ये पहिल्यांदाच आदिवासी नृत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जगभरातून तब्बल १,३५० स्पर्धकांनी भाग घेतला आहे. 



राहुल गांधी यांनी या कार्यक्रमासंदर्भात ट्विटरवरही भाष्य केले. हे संमेलन आपल्या देशातील समृद्ध आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन आणि संरक्षणाच्यादृष्टीने अतिश्य महत्वाचे आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मला या कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी विचारले तेव्हा मी क्षणाचाही अवधी न लावता होकार दिला. आज देशातील परिस्थिती तुम्ही पाहात आहात. माझे म्हणणे एवढेच आहे की, आदिवासींना सोबत घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. छत्तीसगढमध्ये आदिवासींचा आवाज ऐकला जातो, याविषयी मला आनंद असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.