नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनामध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. विजेत्या पुरस्कारार्थींमध्ये कर्नाटकच्या तृतीयपंथी लोक कलाकार मंजम्मा जोगती यांच्याही नावाचा समावेश होता. जोगती यांचं नाव घोषित झाल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या मंचकापाशी आल्या आणि आवाज झाला तो फक्त कॅमेऱ्यातून फोटो टीपण्याचा आणि टाळ्यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोगती यांनी एका खास अंदाजात सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समोरच उभ्या राहिल्या. तिथे पोहोचून त्यांनी साडीच्या पदराने राष्ट्रपतींची दृष्ट काढली. 


पुढे मंजम्मा यांनी त्यांचे हात जमिनीवर टेकत दृष्ट काढणं सुरुच ठेवलं. त्यांनी केलेली ही कृती तिथं उपस्थित सर्वांसाठीच नवी होती. अनेकजण हे पाहून भारावले. देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींच्या हितासाठीच मंजम्मा यांनी केलेली ही कृती सर्वांना थक्क करणारी होती.


सहसा तृतीयपंथी समोर आल्यानंतर ही मंडळी सर्वांनाच आशीर्वाद देत भावी आयुष्यावरील इडापिडा टळो असं साकडं घलाताना दिसतता. राष्ट्रपतीभवनातहीअसाच काहीसा प्रकार घडला. राष्ट्रपतींनीही मंजम्मा यांच्यापुढे हात जोडत त्यांनी केलेल्या या आदराचा स्वीकार आणि सन्मान केला. त्या क्षणी तिथे टाळ्यांचा कडकडाट गुंजला. 



सोशल मीडियावर पद्म पुरस्कारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. प्रत्येक व्हिडीओचं आपलं असं एक वेगळेपण होतं. यामध्ये मंजम्मा यांचा हा व्हिडीओ सर्वाधिक गाजलेला आणि चर्चेत असणारा व्हिडीओ ठरला.