मुंबई : वाढत्या महागाईने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना परत एकदा महागाईची झळ बसणार आहे. रेल्वेने पाण्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना थंड पाणी मिळावं, यासाठी वॉटर व्हेंडिग मशीन बसवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली. याआधी प्रवाशांना पाण्यासाठी जास्त दरात बाटलीबंद पाणी घ्यायला लागायचं. पण रेल्वे स्थानकात वॉटर व्हेंडिग मशीन लागल्यापासून प्रवाशांना स्वच्छ पाण्याची सुविधा मिळाली. पण आता या पाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. रेल्वेने वॉटर व्हेंडिग मशीनद्वारे मिळणाऱ्या पाण्याचे दर वाढवले असून, एक ग्लास पाण्याची किंमत दुप्पट करण्यात आली आहे. लवकरच या वाढलेल्या किंमती लागू करण्यात येणार आहेत.


असे असतील वाढलेले दर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिग मशिनद्वारे १ रुपयात ३०० मिली इतकं पाणी मिळतं. या दरात वाढ करुन २ रुपये करण्यात आली आहे. तर बॉटलभर पाणी हवं असल्यास त्यासाठी २ रुपये द्यावे लागतात. पण आता त्यासाठी ३ रुपये द्यावे लागणार आहेत. इतर पाण्याच्या श्रेणीत कोणताही बदल केलेला नाही. ग्लास आणि बाटलीमध्ये पाणी घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 


रेल्वेचं उत्पन्न वाढणार


पिण्याच्या पाण्यात केलेल्या दरवाढीमुळे रेल्वेला फायदा होणार आहे. रेल्वे स्थानंकांवर वॉटर व्हेंडिग मशीन लावण्याचं काम आयआरसीटीसीकडे आहे. आयआरसीटीसीने रेल्वे स्थानकांवरील वॉटर व्हेंडिग मशीनच्या दरात वाढ करण्याची मागणी केली होती. वाढलेल्या दरानंतर रेल्वेमार्फत कंत्राटदारांकडून घेतल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातदेखील वाढ होणार आहे. या परवाना शुल्कात किती वाढ करण्यात यावी, यावर आयआरसीटीसीच्या अधिकांऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.