नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे, ही बाब आता केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ उरलेला नाही, असे मत AIIMS 'एम्स'चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी व्यक्त केले. 'आऊटलूक' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारच्या अडथळ्यामुळे देशात समूह संसर्ग झालाय, हे सत्य स्वीकारले जात नाही. जर देशात समूह संसर्ग झाला नसता तर दररोज १० हजार नवे रुग्ण कुठून सापडत आहेत? त्यामुळे देशात समूह संसर्ग झाला नाही, अशा थाटात वावरणे म्हणजे डोळे झाकून घेण्यासारखे आहे. आपण योग्यप्रकारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न केल्यामुळेच भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना : गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा


काही दिवसांपूर्वीच 'एम्स'मध्ये ४०० निवासी डॉक्टर, प्राध्यापक आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. यापैकी बहुतांश जणांनी आपल्याला रुग्णालयात नव्हे तर बाहेर असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. बाहेर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली याचा अर्थ हा समूह संसर्ग आहे. कारण यापैकी कोणीही परदेशातून प्रवास करुन परतले नव्हते, याकडे डॉ. मिश्रा यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेकजण घराबाहेर पडल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे.  ज्या भागात एकही रुग्ण नव्हता, तिथेही करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक गैरसमजात राहणार नाही आणि अधिक काळजी घेतील, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.


'जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये कोरोना 'पिक'ला पोहोचेल'
स्थलांतरित मजूर मोठ्याप्रमाणावर आपल्या गावी परतले नसते तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनाचा पीक येऊन गेला असता. मात्र, सध्या देशात दररोज १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. जर १५ जुलैनंतर हा आकडा कमी झाला आणि आपण टेस्टिंगची संख्या वाढवली तर जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या मध्यात देशातील कोरोनाचा प्रादुर्भावा शिगेला पोहोचला, असे म्हणता येईल.