इस्लामाबाद: भारतावर हल्ला करून आम्हाला काय मिळणार आहे, असा सवाल उपस्थित करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाकारला. इम्रान खान यांनी मंगळवारी आकाशवाणीवरून पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी म्हटले की, हा नवा पाकिस्तान आहे. आम्हाला देशात स्थैर्य हवे आहे. आता कुठे आम्ही त्या दिशेने वाटचाल करायला लागलो आहोत. मग अशावेळी भारतावर हल्ला करून आम्हाला कोणताही फायदा होणार नाही, असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, भारत आमच्यावर हल्ला करण्याचा विचार करत असेल आणि आम्ही प्रतिकार करणार नाही, असे कोणाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चूक आहे. आम्ही भारताच्या हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देऊ. युद्ध सुरू करणे हे आपल्या हातात असते. मात्र, हे युद्ध आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हे देवालाच माहिती आहे. त्यामुळे ही समस्या चर्चेनेच सोडवली पाहिजे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप करत आहे. पाकिस्तानातील कोणीही हिंसा न करणे, हेच आमच्या देशासाठी हिताचे आहे. यानंतरही भारताने पाकिस्तानमधील कोणाविरुद्ध पुरावे दिले तर आम्ही त्यांच्यावर जरूर कारवाई करू, असे आश्वासन यावेळी इम्रान खान यांनी दिले. 



१४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवाद्याने काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून भीषण स्फोट घडवून आणला होता. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारी अशा प्रत्येक स्तरावर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे.