नवी दिल्ली: लॉकडाऊन म्हणजे एखादा ऑन-ऑफ स्विच नाही. त्यामुळे केंद्र सरकारने  देशातील लॉकडाऊन कशाप्रकारे उठवायचा याची निश्चित रणनीती ठरवली पाहिजे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी आता केंद्र सरकारने लॉकडाऊननंतर देश कसा सुरु करायचा, याची नीट आखणी केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, लॉकडाऊन म्हणजे एखादा ऑन-ऑफ स्विच नव्हे. त्यामुळे आता लॉकडाऊनंतर देशात काय करायचे, याचे नियोजन सरकारने केले पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे सरकारने आपल्या कारभारात पारदर्शकता आणायला पाहिजे. लोकांना सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगायला हव्यात. तसेच निर्णय घेताना केंद्रीकरण टाळले पाहिजे, असे राहुल यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वप्रथम या लॉकडाऊनची मोठी झळ बसलेल्या लोकांना तात्काळ मदत पुरविली पाहिजे. अन्यथा आपण काहीच करु शकणार नाही. काँग्रेसने आखलेल्या न्याय योजनेप्रमाणे या लोकांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ पैसे जमा केले पाहिजेत. स्थलांतरित कामगार, गरीब आणि लघुद्योगांना आजच आर्थिक मदत केली पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर मदत करून काही फायदा होणार नाही. कारण, या उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली. 



तसेच लोकांच्या मनातून कोरोना व्हायरसची (Coronavirus) भीती दूर झाली पाहिजे, असे मतही राहुल गांधी यांनी मांडले. एका विशिष्ट वयोगटातील लोकांनाच कोरोनाचा जास्त धोका आहे. ही गोष्ट वगळता कोरोना व्हायरस तितकासा धोकादायक नाही. मात्र, तरीही लोकांना कोरोनाची भीती वाटत आहे. लोकांच्या या मानसिकतेत बदल घडवण्याची गरज आहे. हा लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यासाठी सरकारने लोकांच्या मनातील भीती सर्वप्रथम दूर केली पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.