लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी सर्वस्व पणाला लावून लढूयात, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केले. त्या बुधवारी उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. उत्तर प्रदेशातील महान दल आणि काँग्रेस पक्षाच्या युतीची घोषणा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रियंका यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत सर्वस्व पणाला लावून लढण्याचे आवाहन केले. काही दिवसांपूर्वीच प्रियंका यांच्यावर काँग्रेसकडून पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रियंका यांच्या उपस्थितीत महान दलाशी हातमिळवणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेशातील शाक्य, मौर्य आणि कुशवाह हा ओबीसी मतदार महान दलाचा जनाधार आहे. याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. २०१४ च्या निवडणुकीत महान दलाने बदाऊन, नगिना आणि इटाह या तीन लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, तिन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सपा आणि बसपा यांच्याशी युती करण्यासाठी उत्सुक होता. मात्र, या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला दूर ठेवले होते. यानंतर काँग्रेसकडून उत्तर प्रदेशात नव्या मित्रपक्षांचा शोध घेतला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसने महान दलाशी युती केली. 



दरम्यान, प्रियंका गांधी आपल्या उत्तर प्रदेश दौऱ्यात वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना गटबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच राज्यातील प्रत्येक गैरप्रकाराविरोधात रस्त्यावर उतरा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांना काम करताना कोणतीही अडचण आली तर त्याची माझ्याकडे लगेच तक्रार करा. त्यासाठी प्रियंका यांनी आपला मोबाईल नंबरही कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते.