मुंबई : 'आहे रे आणि नाही रे' वर्गातील दरी आता प्रचंड रुंदावत चाललीय. जगातील श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत चाललेत तर गरीब आणखीनच गरीब... एका ताज्या अहवालामधून हीच गोष्ट प्रकर्षानं समोर आलंय. भारतातील अरबपतींची संख्या प्रचंड वेगानं वाढतेय. भारतातील कोट्यधीशांच्या संपत्तीत २०१८ मध्ये प्रत्येक दिवसाला जवळपास २२०० कोटी रुपयांचा फायदा झालाय. आंतरराष्ट्रीय एजन्सी Oxfam च्या एका अहवालानुसार, भारतातील ९ श्रीमंतांकडे ५० टक्के लोकांच्या संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती आहे. २०१८ ते २०२२ दरम्यान भारतात दररोज ७० श्रीमंत वाढतील, असंही यात नमूद करण्यात आलंय. २०१८ मध्ये भारतात जवळपास १८ नवे अरबपती बनलेत. आता देशातील एकूण अरबपतींची संख्या ११९ वर गेलीय. त्यांच्याकडे एकूण २८ लाख कोटींची संपत्ती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Oxfam च्या अहवालानुसार, भारतातील जवळपास अर्ध्या जनसंख्येची आर्थिक वृद्धी गेल्या वर्षात खूपच धीम्या गतीनं होतेय. ५० टक्क्यांहून अधिक लोकांच्या संपत्तीत सरासरी ३ टक्क्यांची वाढ झालीय. 


दुसरीकडे, देशातील एकूण जनसंख्येच्या केवळ एक टक्के लोकांच्या संपत्तीत गेल्या वर्षात ३९ टक्क्यांची वाढ झालीय. भारतात १० टक्के लोकांकडे देशातील एकूण ७७.४ टक्के संपत्ती आहे. यातील केवळ एका टक्क्याकडे एकूण ५१.५३ टक्के संपत्ती आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर गरीबांची संपत्ती आणखीन घटली


आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं तर जगातील कोट्यधीशांच्या संपत्तीत प्रत्येक दिवसाला सरासरी १२ टक्क्यांची वाढ झालीय. मात्र, जगभरात असणाऱ्या गरीबांच्या संपत्तीत मात्र ११ टक्क्यांनी घट झालेली दिसतेय. जगातील केवळ २६ लोकांकडे ३.८ अब्ज लोकांहूनही अधिक संपत्ती आहे. 


उदाहरण द्यायचंच झालं तर अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्याकडे ११२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे, म्हणजेच इथोपियासारख्या देशाच्या एकूण आरोग्य अर्थसंकल्पाएवढी आहे. इथोपियाची लोकसंख्या ११५ मिलियन आहे.