दिल्ली : सुमारे 10 दिवसांचा कालावधी घेतल्यानंतर मान्सूनने कमबॅक केलं आहे. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे बुधवारी देशभरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे लोकांना दसऱ्याचा आनंदही घेता आला नाही. या पावसामुळे आता हवामानातही बदल दिसून येत आहे. दिवसाही वातावरण उष्ण असलं तरी आता रात्री थंडी जाणवतेय. 


8 ऑक्टोबरपर्यंत हवामान सक्रिय राहणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून आठ ऑक्टोबरपर्यंत सक्रिय राहणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा यासह अनेक भागांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 6-7 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस पडेल, त्यामुळे विभागाने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलाय. लोकांनी 8 ऑक्टोबरपर्यंत उत्तराखंडच्या डोंगराळ भागात जाण्यापासून परावृत्त करण्याचं आवाहन विभागाने केलंय.


रात्रीच्या तापमानात घट


पावसासोबत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आता वातावरणात बदल झालाय. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या जवळ आहे. तर रात्री थंडी पडू लागलीये. रात्रीचं किमान तापमान आता 20 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय.


येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळा पूर्णपणे येईल. मात्र, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत असल्याने डास-माशी आणि इतर जीवाणू सक्रिय झाले आहेत. त्यामुळे लोक अनेक संसर्गजन्य आजारांनी त्रस्त आहेत.


दिल्ली-एनसीआरमध्येही पाऊस पडेल


दिल्ली-एनसीआरच्या हवामान ९ ऑक्टोबरपर्यंत आल्हाददायक राहील. दिवस ढगाळ राहील आणि अनेक भागात हलका पाऊस पडू शकतो. पावसामुळे रात्री थंडी वाढणार आहे. काही भागात पावसासह विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे गडगडाट असेल तेव्हा लोकांनी उघड्यावर जाणं टाळावं.