Monsoon Updates : महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावर चक्रिवादळाचं सावट असतानाच एकिकडे वादळाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहेत. तर, दुसरीकडे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वजण नजरा लावून बसल्याचं पाहायला मिळत आहे. अशा सर्वांसाठीच ही आनंदाची बातमी. कारण, मान्सूनचा पहिला मुहूर्त हुकला असला तरीही आता मात्र तो केरळात अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच पोहोचणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे वेधळशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्याच्या घडीला दक्षिण अरबी समुद्रावर पश्‍चिमेकडील वाऱ्यांचा कायम राहिल्यास पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्ये वाढ नोंदवली जात आहे. शिवाय अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्‍यावरील ढगाळ वातावरणातही वाढ झाली आहे. परिणामी पुढील 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होऊन पावसाची दणक्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. आयएमडीनंही या वृत्तावर शिक्कामोर्तब करत मान्सून 9 जूनपर्यंत केरळात दाखल होईल या माहितीला दुजोरा दिला. 


हेसुद्धा वाचा : Restaurant Of Mistaken Orders : 'या' हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत? 


 



'बिपरजॉय' चक्रिवादळानं अडवली मान्सूनची वाट? 


IMD च्या माहितीनुसार मंगळवारीच अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागात घोंगावणाऱ्या वाऱ्यांचं रुपांतर चक्रिवादळात झालं. 'बिपरजॉय' नावाच्या या चक्रिवादळाचे थेट परिणाम मान्सूनवर झाले आणि 4 जूनला केरळात अपेक्षित असणारा मान्सून काही दिवस लांबणीवर पडला. दरम्यान, सध्याच्या घडीला या चक्रिवादळामुळं महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात बहुतांश ठिकाणांवर काळ्या ढगांची दाटी झाली असून, काही भागांमध्ये पावसालाही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकणचा किनारपट्टी भाग, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. तर, मुंबई, ठाणे, पालघरमध्येही सोसाट्याचा वारा आणि पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 


तिथे सध्याच्या घडीला मान्सूनच्या वाटचालीसाठी पूरक वातावरण पाहायला मिळत असल्यामुळं तो आता काही दिवसांतच महाराष्ट्रातही दाखल होईल. ज्यामुळं आता शेतीच्या कामांना वेग आल्याचंही पाहायला मिळणार आहे.