Video : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, सूर्य आग ओकत असताना सैनिक देशाच्या सीमेवर तैनात
Heatwave in india : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, इतक्या कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावतायत सैनिक... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Heatwave in india : अल निनोच्या (Al nino) परिणामामुळं मागील वर्षी पाऊस कमी झाला आणि यंदाच्या वर्षी उकाडा अपेक्षेहून अधिकच तीव्र भासला. देशाच्या बहुतांश भागांमध्ये फेब्रुवारी 2024 पासूनच उन्हाच्या झळा दिवसागणिक तीव्र होण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता मे महिन्याच्या मध्यापर्यंत सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान यांसारख्या राज्यांसह दक्षिणेकडेही सूर्याचा प्रकोप पाहायला मिळाला.
हवामान विभागानंही देशातील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत हा उकाडा आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचं सांगत उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला. देशात उकाडा नेमका किती आहे, किंवा तापमानाचा आकडा नेमका किती अंशांवर पोहोचला आहे? या आणि अशा प्रश्नांचं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ देत आहे.
भारत- पाकिस्तान सीमेवर (India Pakistan Border) देशसंरक्षणार्थ तैनात असणाऱ्या एका जवानाचा हा व्हिडीओ असून, त्यामध्ये हा जवान बिकानेर येथील रणरणत्या उन्हात, 47 अंश सेल्सिअस इतक्या तापमानामुळं तापलेल्या वाळूमध्ये चक्क पापड भाजून त्या भागातील तापमान नेमकं किती असेल हेच सर्वांना दाखवताना दिसत आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा
मागील काही दिवसांपासून बिकानेरमध्ये उकाडा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिक घराबाहेर निघणंही टाळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये बिकानेरमधील नेमकी परिस्थिती अवघ्या काही सेकंदांत सर्वांसमोर येतेय. जिथं जवानानं पापड वाळूत ठेवून त्यावरही वाळू टाकून 35 सेकंदांत तो बाहेर काढला असता त्याचे अगदी सहज तुकडे पडताना दिसतायत. वाळूमध्ये पापड ठेवला असता तो 75 टक्के भाजून निघाला, जिथं या पापडाची ही अवस्था होतेय तिथं मग मानवी जीवनावर या उष्णतेचा नेमका किती आणि कसा परिणाम होत असेल या विचारानंच अनेकांना घाम फुटला.
राजस्थानातील भीषण उष्णतेच्या विचारानं अनेकांनाच धडकी भरलेली असताना या व्हिडीओच्या निमित्तानं देशसंरक्षणार्थ तैनात असणाऱ्या जवानांना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करत कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर रहावं लागतं, ही वस्तुस्थिती सर्वांसमोर आली.