Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस.... राज्याच्या कोणत्या भागासाठी दिला हा इशारा? मुंबईकरांनो तुम्हीही वाचा हवामान वृत्त...   

सायली पाटील | Updated: May 23, 2024, 07:39 AM IST
Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशारा  title=
Maharashtra Weather News monsoon latest update rain predictions in konkan and vidarbha

Maharashtra Weather News : अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सूननं (Monsoon) आता देश व्यापण्यास सुरुवात केली असून, मान्सूचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. तर, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगर भागामध्ये अधूनमधून सूर्य झाकोळणार असून, काही भागांमध्ये उकाडा अधिक जाणवेल. सायंकाळच्या वेळी आभाळात पावसाळी ढगांचा खेळ पाहायला मिळू शकतो. 

मागील 24 तासांमध्ये हवामानाची काय स्थिती? 

बुधवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पुन्हा एकदा चिपळूण तालुक्याला झोडपून काढलं. डेरवणमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. काजरकोंड गावात घरावरील पत्र उडून गेले, तर अनेकांच्या घरांवर झाडं पडल्यामुळे घरांचं नुकसान झालं. 

हेसुद्धा वाचा : उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले 'त्या' पत्रकार परिषदेच्या चौकशीचे आदेश

तिथं यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसला. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात धुवांधार पाऊस झाल्याने अनेक वृक्ष उन्मळून पडली. तर अनेक घरांवरील टीनपत्रे उडाले. मोठ्या प्रमाणात आंबा, भाजीपाला पिकांसह ज्वारी आणि तीळ पिकाला फटका बसला. 

कुठवर पोहोचला मान्सून? 

सध्या संपूर्ण देशात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांचा आणखी काही भाग व्यापताना दिसणार आहे. इथून पुढं हे मान्सूनचे वारे अंदमानचा समुद्र व्यापणा असून, केरळच्या दक्षिण भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. ज्यामुळे लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.