Weather Update News : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. राजधानी दिल्लीसह (delhi weather) उत्तर पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट (Cold Wave) आली आहे. भारताच्या उत्तरेकडील भागापासून दक्षिणेकडे तेलंगणापर्यंत कडाक्याची थंडी पसरली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश सारख्या राज्यांपेक्षाही कमी तापमानाची नोंद दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये झाली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांमध्ये थंडी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. याशिवाय दक्षिण भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

200 मीटर अंतरावरील व्यक्ती दिसेना


भारतीय हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसाठी अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. तर राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची परिस्थिती पाहता अनेक राज्य सरकारांनी शाळांच्या सुट्या वाढवल्या आहेत. ही राज्ये सध्या दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीच्या गर्तेत आहे. धुक्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता 200 मीटरपेक्षा कमी झाली आहे.


यासोबतच भारतीय हवानाम खात्याने बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात येत्या दोन दिवसांत थंडीची लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मध्य भारतातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. दुसरीकडे पूर्व भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात बदल झालेला नाही.


शाळाही बंद


थंडीची लाट पाहता उत्तर प्रदेश सरकारने रविवारी रात्री राज्यातील शाळांना सुटी देण्याबाबत सुधारित नोटीस जारी केली. त्यानुसार इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद राहतील. तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरु राहणार आहे. झारखंड सरकारने बालवाडी ते इयत्ता 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सरकारी आणि खाजगी शाळा 14 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याची नोटीस जारी केली आहे.


दक्षिणेत काय स्थिती?


दरम्यान, दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर दुसरीकडे तेलंगणातील आदिलाबाद, कुमुरम भीम, नरमिल, मंचेरियल, करीमनगर, पेड्डापल्ली आणि जगतियाल जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत अनेक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.