लग्नाच्या दिवशी लग्नमंडपाआधी नवरी पोहोचली परीक्षा हॉलमध्ये
लग्नाचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर देखील लग्नाशी संबंधीत अनेक व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात.
मुंबई : लग्नाचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियावर देखील लग्नाशी संबंधीत अनेक व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी लग्नातील एखाद्या क्षणाचे असतात. तर कधी हे ते एखाद्या गंमतीदार गोष्टीचे असतात, जे पाहून आपल्याला आपले हसू आवरत नाही. सोशल मीडियाचं जग हे असं आहे, जेथे आपल्याला कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. असाच एक आगळा-वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे, ज्याची आपण कधी कल्पाना देखील केली नसावी.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एक वधू तिच्या लग्नाच्या आधी तिच्या लग्नतील कपड्यातच विद्यापीठात परीक्षेसाठी गेली असल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमधील ही वधूचे नाव शिवांगी बगथरिया आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील राजकोट भागातील असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार शिवांगी बगथरिया सकाळी तिच्या भावी पतीसोबत शांतीनिकेतन कॉलेजमध्ये गेली होती. या नववधूने नंतर बीएसडब्ल्यूच्या (बॅचलर ऑफ सोशल वर्क) 5 व्या सेमिस्टरची परीक्षा दिली. दोन्ही कुटुंबीयांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याचे तिने स्वत: पत्रकारांना सांगितले.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधू लग्नाच्या लाल जोड्यात इतर विद्यार्थ्यांसोबत परीक्षा हॉलमध्ये बसून पेपर लिहत आहे.
वधू वर अशी वेळ का आली?
या घटनेबाबात स्पष्टीकरण देताना वधूने सांगितले, जेव्हा तिच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती, तेव्हा परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले नव्हते. योगायोगाने तिच्या लग्नाच्याच दिवशीच तिची परीक्षा होती, ज्यामुळे तिने प्रथम येऊन परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिने नवऱ्यासोबत सात फेरे घेण्याचा निर्णय घेतला.
तिच्या या निर्णयाला तिच्या घरच्यांनी, नवऱ्याने आणि सासरच्या मंडळींनी देखील पाठिंबा दर्शवला ज्यामुळे तिला हे करणं शक्य झालं.
इंस्टाग्रामवर लोकांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ 'व्हायरल भयानी' यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर 4 लाख 34 हजार 848 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित आणि आनंदी दिसत असताना, शिवांगीने तिच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याच्या निर्णयाने लोकांना प्रेरित केले. मात्र, हा केवळ लोकप्रियता मिळविण्याचा मार्ग असल्याचे सांगत अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केल्या आहेत.