नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या पाचव्या टप्प्यात 7 राज्यांमधील 51 जागांवर मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालच्या 7 मतदार संघात देखील मतदान होत आहे. राज्याच्या बैरकपूर लोकसभा जागेत भाजपाचे उमेदवार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप लगावला आहे. बैरकपूर लोकसभा जागेच्या टीएमसीचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी रिंगणात आहेत. तर सीपीएमने गार्गी चॅटर्जी यांना मैदानात उतरवले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मतदाना दरम्यान भाजपा उमेदवाराने टीएमसी कार्यकर्त्यांवर मतदारांना धमकावल्याचा आरोप लावला आहे. बाहेरून आलेल्या टीएमसीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. ते लोक आमच्या मतदारांना घाबरवत होते. मी जखमी देखील झालो आहे असे अर्जून सिंह यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पश्चिम बंगालमध्ये सात जागेंवर तृणमूल काँग्रेस, भाजपा, काँग्रेस आणि सीपीएममध्ये चौरंगी लढत आहे. 2014 मधील निवडणुकीत इथे तृणमूल काँग्रेस सर्वच्या सर्व सात जागांवर विजयी झाली होती. मतदानाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन ट्वीटमार्फत जनतेला केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि भारताला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी मतदान हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. युवा मतदार देखील या रेकॉर्डतोड मतदानात सहभागी होतील असे ते म्हणाले.



दिग्गजांचे भवितव्य 


पाचव्या टप्प्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रायबरेली व अमेठी या मतदारसंघांचा समावेश आहे. यावेळी  यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाच्या स्मृती इराणी यांनी आव्हान उभं केलंय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, 'यूपीए'च्या अध्यक्षा सोनिया गांधी, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अर्जुन राम मेघवाल, राज्यवर्धनसिंह राठोड, साध्वी निरंजन ज्योती, जयंत सिन्हा आदींच्या भवितव्य  आज मतपेटीत बंद होणार आहे.