West Bengal Doctor Rape And Murder Case: कोलकात्यामधील 31 वर्षीय शिकावू महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निघ्रृणमध्ये हत्या केल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. असं असतानाच आता मराठमोळ्या अभिनेत्याने सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.


मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आंदोलन करण्यासारखा भयाण हास्यास्पद प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"कोलकता रेप मर्डर केसमधल्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून ममता बॅनर्जींनी काढलेला मोर्चा हे निव्वळ 'ढोंग' आहे. अरे! तुम्ही मुख्यमंत्री आहात मॅडम. पोलीस आणि प्रशासन तुमच्या एका आदेशावर कामाला लागायला पाहिजे. राज्याच्या प्रमुखांनीच आंदोलन आणि धरणे वगैरे करणं यापेक्षा भयाण हास्यास्पद प्रकार दुसरा असू शकत नाही. एक महिला असून या प्रकाराकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्‍या ममताजींचा त्रिवार निषेध!" असं किरण माने यांनी पोस्टच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, "हा देशच आज इतिहासातल्या सगळ्यात घृणास्पद कालखंडातून चालला आहे," असं म्हटलं आहे. 


मोदींवरही साधला निशाणा


"लाल किल्ल्यावरून भाषण करताना 'आम्ही भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही' असं म्हणत जणू स्वत:लाच ट्रोल करणारे मोदीसुद्धा ममता बॅनर्जींसारखेच अशा ढोंगीपणाचे साक्षात बादशहाच!" असा टोला किरण मानेंनी लागवला आहे. "एकीकडे मणिपूरसारख्या भयानक घटना घडूनही तिकडे न फिरकणार्‍या, कर्नाटकात तीन हजार महीलांवर बलात्कार करणार्‍याला उमेदवारी देणार्‍या, कुस्तीगीर महिलांचे लैंगिक शोषण करणार्‍याला वाचवणार्‍या भ्रष्ट आणि नीच नराधमांनी देशाचं नरडं आवळलंय तर दुसरीकडे बंगालसारख्या ज्या राज्यातल्या जनतेनं हुशारीनं ही अन्यायी क्रूर पिलावळ दूर ठेवली आणि ममताजींना सत्तेत बसवलं, त्यासुद्धा अशा नौटंकीबाज निघाव्यात हे केवढं मोठं दुर्दैव!" असं म्हणत किरण मानेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.


..तर आपल्याकडं श्रीलंका आणि बांग्लादेशपेक्षा भयानक उद्रेक


"भक्त पिलावळीला आणि चाटू मिडीयाला तर जिथं भाजपाचे सरकार नाही, तिथलेच फक्त 'सिलेक्टिव्ह' अत्याचार दिसतात किंवा अत्याचार करणारा मुस्लीम असला तर मात्र यांचं तोंड आणि बुड सगळंच पेटून उठतं. इतरवेळी यांच्या बहिणींची रस्त्यात धिंड निघाली तरी हे सत्ताधार्‍यांची बाजू घेऊन तिला देशद्रोही ठरवत खदाखदा हसतील. अशा नालायक लोकांच्या भवतालात गुरफटलेल्या जनतेनं न्यायासाठी कुणाकडं बघायचं? कुणाचा आधार मागायचा?" असा सवाल किरण मानेंनी केला आहे. "हे असंच चालू राहिलं तर आपल्याकडं श्रीलंका आणि बांग्लादेशपेक्षा भयानक उद्रेक होऊ शकतो. सत्ताधार्‍यांनो, जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका," असा इशारा पोस्टच्या शेवटी या अभिनेत्यानं दिला आहे. 



"ये कुर्सी है, तुम्हारा जनाज़ा तो नहीं है...  कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते!" अशा ओळी पोस्टच्या शेवटी किरण मानेंनी लिहिल्या आहेत.