मोमिता चक्रवर्ती, झी 24 तास कोलाकाता : बातमी आहे पश्चिम बंगालमधून. ईडीनं पश्चिम बंगालमधील अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिच्या घरी छापा टाकलाय. या छापेमारीत अर्पिताच्या घरी 21 कोटी रुपयांची रोकड सापडलीय. तर मोठ्या प्रमाणात सोनं आणि विदेशी चलन आढळून आलंय. अर्पितावरील कारवाईचं राजकीय कनेक्शनही समोर आलंय. या कारवाईनं ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री अडचणीत आलाय.  (west bengal ed raid on actress arpita mukherjee home ssc scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्पिता मुखर्जी, पश्चिम बंगालमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी सध्या हेच नाव ऐकायला मिळतंय. अभिनेत्री असलेल्या अर्पिताच्या घरात कोट्यवधींचं घबाड साडलंय. होय, अगदी बरोबर ऐकलंत. दोन हजारांच्या नोटांचा हा डोंगर पाहा. तिच्या घरात तब्बल 21 कोटींची माया सापडलीय. 2017च्या SSC घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अर्पिताच्या घरात छापा मारला, तेव्हा तिच्या घरात अक्षरश: पैशांचा खच पडला होता. सिनेमांमध्ये साईड ऍक्ट्रेस म्हणून काम करणा-या अर्पिताकडे इतकी गडगंज संपत्ती कुठून आली, असा सवाल आता विचारला जातोय. 


आलिशान प्लॅटमध्ये राहणाऱ्या अर्पिता मुखर्जीनं बंगाली, उडिया आणि तामिळ सिनेमांमधून काम केलंय. ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यासोबत तिचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. पार्थ चॅटर्जी दक्षिण कोलकात्यातील प्रसिद्ध अशा नकटला उदयन या दुर्गा पूजा समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्या दुर्गा पूजा समितीतील मुख्य चेहरा म्हणून अर्पिता मुखर्जीकडे पाहिलं जातं. त्यामुळे अर्पिताकडे पैशांचं घबाड सापडल्यानंतर संशयाची सुई आपोआप पार्थ चॅटर्जींकडे वळलीय.


अर्पिता मुखर्जीकडे 21 कोटींच्या रकमेसोबत 20 लाखांचं सोनं आणि 20 मोबाईल फोनही सापडलेत. या फोनचं ती काय करायची हा देखील एक मोठा प्रश्न आहे. सिनेमांमध्ये साईड रोल करणा-या अभिनेत्रीची आलिशान जीवनशैली आता ईडीच्या रडारवर आलीय. या पैशांचं सत्ताधारी पक्षाशी असलेलं राजकीय कनेक्शनही समोर येतंय. त्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.