प.बंगालमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा
कोलकाता : पश्चिम बंगालमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे गृहमंत्रालयाचा इशारा म्हणजे तृणमूलची सत्ता मागच्या दारानं खेचून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तृणमूलनं भाजपवर केला आहे. तृणमूलनं यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहिलं आहे. तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसक घटना सुरूच आहेत. केंद्र सरकारनं याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत केंद्रानं राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत उत्तर २४ परगाणा जिल्ह्यातल्या संदेशखली इथं तिघांची हत्या झाल्यानंतर केंद्रानं राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत.
हिंसाचार झालेला भाग बशीरहाट मतदारसंघात येतो. शनिवारी झालेल्या हिंसाचारात भाजपनं पाच कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा केला. तर तृणमूल काँग्रेसनं सहा कार्यकर्ते बेपत्ता झाल्याचा दावा केला आहे. रविवारी येथील परिस्थिती तणावपूर्ण होती. शुक्रवारच्या हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह पक्ष कार्यालयात नेण्यास पोलिसांनी मनाई केली. त्याच्या निषेधार्थ भाजपनं काळा दिवस पाळत पश्चिम बंगाल बंदची हाक दिली. तसंच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर या भागात तणावपूर्ण स्थिती होती.